Paris Paralympics 2024 : भारताची युवा शटलर ‘नित्या सिवन’ची कांस्यपदकाला गवसणी….

Paris Paralympics 2024 (ParaBadminton Women’s Singles SH6) : भारताची युवा शटलर नित्या सुमती सिवन हिने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या SH6 प्रकारात पदक जिंकण्यात यश मिळविले आहे. नित्याने कांस्यपदकासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या रीना मार्लिनाचा एकूण 23 मिनिटांत 21-14, 21-6 असा पराभव केला.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील नित्या या 19 वर्षीय खेळाडूने पॅरिसच्या सुमारे 11 महिने आधी आशियाई पॅरा गेम्समध्ये (ऑक्टोबर, 2023) कांस्यपदक जिंकले होते. एकेरीव्यतिरिक्त नित्याने दुहेरी स्पर्धेतही आपली छाप सोडली होती आणि या स्पर्धेत तिने कांस्यपदकही पटकावले होते. नित्याच्या कांस्यपदकासह भारताची एकूण पदकसंख्या 15 वर पोहचलीआहे.
नित्या सिवनने पहिल्या गेमपासूनच सामन्यावर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. इंडोनेशियाची रीना मारलिना तिच्यासमोर टिकू शकली नाही आणि तिचा खेळ विस्कटलेला दिसत होता. भारताच्या नित्या सिवनने पहिला गेम 21-14 ने जिंकला आणि यासह तिने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नित्या सिवनने अतिशय आक्रमक खेळ केला आणि दुसरा गेम अवघ्या 10 मिनिटांत 21-6 असा जिंकला. यासह ती कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली.
𝗝𝗮𝐳𝐛𝗮 𝐇𝗮𝗶 𝐉𝘂𝗻𝗼𝗼𝗻 𝐇𝗮𝗶 𝐓𝗼 𝐌𝘂𝗺𝗸𝗶𝗻 𝐇𝗮𝗶#ParaBadminton: Women’s Singles SH6 Bronze Medal🏸
Nithya Sre, on her #Paralympic debut, defeats Indonesia’s🇮🇩 Rina Marlina 21-14, 21-6 to win India’s 15th medal of the #ParisParalympics2024.#TeamIndia‘s🇮🇳 Para… pic.twitter.com/qPkMy4rMnJ
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
पदकतालिकेत भारत 15 व्या क्रमांकावर..
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या पदकतालिकेत भारत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत एकूण 15 पदके जिंकली असून त्यात 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी तीन खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली आहेत. अवनी लेखरा हिने नेमबाजीत, नितीश कुमारने बॅडमिंटनमध्ये आणि सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
Paris Paralympics 2024 : सुमित अंतिलने रचला इतिहास, पॅरालिम्पिक विक्रमासह मिळवलं सुवर्णयश….
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या पदकतालिकेत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत (शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत) एकूण 88 पदके जिंकली असून त्यात 43 सुवर्णांचा समावेश आहे. ग्रेट ब्रिटन 29 सुवर्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यूएसए 14 सुवर्ण जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.





