Paris Paralympics 2024 : भारताच्या नितेश कुमारचा ‘गोल्डन स्मॅश’; बॅडमिंटनमध्ये पटकावलं सुवर्णपदक…

Paris Paralympics 2024 (Badminton Men’s Singles SL3 Event) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताच्या खेळाडूंचा धमाकेदार खेळ सुरू आहे. आज (2 सप्टेंबर) पाचव्या दिवशी भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने भारताच्या पारड्यात आणखी एका पदकाची भर टाकली आहे. सोमवारी त्याने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
आयआयटी (IIT) मंडीचा पदवीधर असलेला नितेश कुमारने पुरुष एकेरीच्या एसएल3 (SL3) प्रकारातील अंतिम फेरीत ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव करत सुवर्णयश संपादन केले. पॅरिसमधील भारताचे हे दुसरे सुवर्ण आणि एकूण नववे पदक आहे. नितेशच्या आधी नेमबाज अवनी लेखरा हिने सुवर्णपदक जिंकले होते. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा नितेश हा तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. प्रमोद भगत (SL3) आणि कृष्णा नगर (SH6) यांनी टोकियोमध्ये पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले होते.
Nitesh nails it!! Second #Gold🥇for India at #ParisParalympics2024😍🥳
The 29-year-old becomes the third para shuttler in the Men’s Singles SL3 category to win a medal for #TeamIndia, and he did so without losing a single match 🤯at #Paris2024.
5 matches. 5 wins ✅
In the… pic.twitter.com/eGBRfoigHd
— SAI Media (@Media_SAI) September 2, 2024
नितेश कुमार आणि डॅनियल बेथेल यांच्यात सुवर्णपदकाच्या लढतीत चुरशीची स्पर्धा झाली. नितीशने पहिला सेट 21-14 असा जिंकला. त्याचवेळी दुसऱ्या सेटमध्ये दमदार कामगिरी करूनही त्यांना 18-21 असा पराभव पत्करावा लागला. एकेकाळी हा सेट 16-16 असा बरोबरीत होता, पण ब्रिटीश शटलरने दमदार कामगिरी करत हा सेट जिंकला. यानंतर नितेशने तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये चांगले पुनरागमन केले आणि सेट 23-21 असा जिंकून सुवर्णपदक पटकावले. दोन्ही खेळाडू प्रत्येकी एका गुणासाठी लढताना दिसले. नितेशचे पॅरालिम्पिकमधील हे पहिले पदक आहे.
Paris Paralympics 2024 : भारताच्या पदकांचे अष्टक, योगेश कथुनियाने ‘डिस्कस थ्रो’मध्ये पटकावले रौप्य…
वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पराभवाचा घेतला बदला…
नितेश कुमारला यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यावेळी नितेशला उपांत्य फेरीत बेथेलकडून पराभव पत्करावा लागला होता. पण आता नितेशने पॅरालिम्पिकच्या अंतिम फेरीत बेथेलचा पराभव करून बदला पूर्ण केला. 2022 मध्ये नितीशने 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. गेल्या वर्षी आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते, तर एकेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
Paris Paralympics 2024 : निषाद कुमारची अप्रतिम कामगिरी, उंच उडीत जिंकले रौप्यपदक…
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
9. नितेश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्ण पदक, पुरुष एकेरी बॅडमिंटन (SL3)





