Paris Olympics 2024 (Weightlifting) : आज चानू उचलणार पदक’भार’, टोकियोपेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा…

Paris Olympics 2024 (12 th Day, Weightlifting,Mirabai Chanu) : मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि पुन्हा एकदा तिच्याकडून त्या पराक्रमाची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा आहे. मीराबाई जर पदक मिळवण्यात यशस्वी ठरली तर ती त्या भारतीय खेळाडूंमध्ये सामील होईल ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. आत्तापर्यंत सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू बुधवारी रात्री 11 वाजता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक’भार’ उचलणार आहे. यंदा मीराबाई तिच्या आवडत्या 49 किलो वजनी गटात आव्हान देईल, ज्यात तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरीच्या अपेक्षा आहेत.
गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकून चानूने भारताचे पदकांचे खाते उघडले होते. मात्र त्यानंतर तिला दुखापतींनी त्रास दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती चांगली तयारी करू शकली नाही. टोकियोनंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये 201 किलो (88 किलो, 113 किलो) वजन ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. तिने टोकियोमध्ये २०२ किलो (८७ किलो आणि ११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले होते.
चीनची सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन हौ झिहुई पुन्हा या वजनी गटात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार आहे. हिपच्या दुखापतीतून सावरल्यानंतर मीराबाईने पुनरागमन केले आहे, मात्र तिच्या फिटनेसबाबत अद्यापही अटकळ बांधली जात आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मात्र चानू पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा केला आहे.
Paris Olympics 2024 (Hockey) : फायनलसाठी एक संघ झाला निश्चित, सेमीफायनलमध्ये 4-0 ने मिळवला विजय…
शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्हाला माहित आहे की, मीराबाईला पदकासाठी 200 किलोपेक्षा जास्त वजन उचलावे लागेल. यावेळी तिच्यासाठी 202 किलोमध्ये कोणतीही कपात होणार नाही. परंतु तिने 205-206 किलोपर्यंत जावे, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत.





