Paris Olympics 2024 : स्टार खेळाडू मेस्सीला अर्जेंटिनाच्या संघात स्थान नाही, ‘या’ खेळाडूंची झाली ऑलिम्पिकसाठी निवड…

Men’s Olympic Football Tournament Paris 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. ऑलिम्पिक 2024 चे आयोजन यावर्षी पॅरिसमध्ये करण्यात आले आहे. 26 जुलैला महाकुंभ सुरू होणार असून, तो 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हळूहळू या स्पर्धेसाठी खेळाडू आणि संघांची नावे जाहीर केली जात आहेत. दरम्यान, 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाचा संघही सहभागी होत आहे. यासाठी अर्जेंटिनाने आपला संघ जाहीर केला. आश्चर्यकारक बाब म्हणजे अर्जेंटिनाचा सर्वात मोठा खेळाडू फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचे नाव मात्र या संघात नाही. मंगळवारी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक जेवियर मास्चेरानो यांनी संघाची घोषणा केली. विश्वचषक विजेत्या संघातील केवळ चार सदस्यांना या संघात स्थान देण्यात आले आहे. या चार खेळाडूंमध्ये स्ट्रायकर ज्युलियन अल्वारेझ आणि बचावपटू निकोलस ओटामेंडी यांचा समावेश आहे. मात्र, मेस्सीला या संघात स्थान मिळालेले नाही.
मेस्सीने पटकावले आहे सुवर्णपदक….
मेस्सी यंदा दुखापतींशी झुंज देत असून तो सध्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2021 मध्ये जिंकलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद कायम राखण्याचे या संघाचे लक्ष्य आहे. 2021 मध्ये कोपा अमेरिका जिंकल्यानंतर अर्जेंटिनाने 2022 मध्ये विश्वचषकही जिंकला होता. मेस्सीने त्याच्या एकमेव ऑलिम्पिक मोहिमेत म्हणजेच बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्वूपर्ण योगदान दिले होते.
‘या’ खेळाडूंची झाली ऑलिम्पिकसाठी निवड…
ऑलिम्पिक पुरुष फुटबॉल स्पर्धा 23 वर्षांखालील संघांसाठी आहे, परंतु सर्व संघांना अधिक वयोगटातील (23 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या) तीन खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी आहे. 2004 आणि 2008 मध्ये खेळाडू म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा मास्चेरानो तसेच गोलरक्षक जेरोनिमो रुल्ली, ओटामेंडी आणि अल्वारेझ यांचा संघात समावेश कोपा अमेरिका संपल्यानंतर होईल. नुकताच रिव्हर प्लेटमधून मँचेस्टर सिटीमध्ये सामील झालेला मिडफिल्डर क्लॉडिओ इचेवेरीही संघात सामील होणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये ‘या’ संघांशी होणार सामना…
24 जुलै रोजी मोरोक्कोविरुद्ध होणाऱ्या ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यापूर्वी अर्जेंटिना फ्रान्समध्ये दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. अर्जेंटिना आणि मोरोक्कोशिवाय इराक आणि युक्रेनचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेसाठी ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे.





