Paris Olympics 2024 : भारताने 1900 साली पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये घेतला होता सहभाग..! जाणून घ्या, कशी राहिली आहे आतापर्यंतची कामगिरी…

India’s Olympics medal history : पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असून भारतीय खेळाडूंनी त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगले यश मिळविले होते आणि देशाला आशा आहे की पुन्हा एकदा यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू तिरंगा फडकवतील. साल 1900 मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता जेथे नॉर्मन प्रिचार्डने 200 मीटर स्प्रिंट आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. पदकांच्या बाबतीत भारताची सर्वोत्तम कामगिरी टोकियो 2020 मध्ये होती जिथे संघाने एका सुवर्णासह एकूण सात पदके जिंकली होती.
ऑलिम्पिकमध्ये भारत 26व्यांदा घेणार सहभाग…
भारत 26व्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. मात्र, भारताच्या झेंड्याखाली 20 वेळा या खेळांमध्ये सहभागी झाला आहे. यावेळी भारताचे 118 खेळाडू पदकांसाठी झटणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 124 खेळाडूंनी भाग घेतला होता आणि गेल्या वेळेच्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. ब्रिटीश राजवटीत भारताने पहिले पाच ऑलिम्पिक खेळले होते.
ऑलिम्पिक इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या नावावर आतापर्यंत एकूण 35 पदके आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, 09 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय हॉकी संघाने सर्वाधिक आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत आणि टोकियो 2020 मध्ये भालाफेकमध्ये नीरज चोप्रा याने वैयक्तिक स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिक मोहिमेबद्दल बोलायचे झाले तर, भारताने 2012 लंडन ऑलिम्पिकमधील कामगिरी मागे टाकत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली होती, ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एकूण सहा पदके होती.
ऑलिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची कामगिरी… (वर्ष, स्थान ,सहभागी खेळाडू संख्या, पदक संख्या)
1990, पॅरिस, 01, 02
1920, अँटवर्प, 02, 00
1924, पॅरिस, 13, 00
1928, ॲमस्टरडॅम, 22, 01
1932, लॉस एंजेलिस, 18, 01
1936, बर्लिन, 27, 01
1948, लंडन, 86, 01
1952, हेलसिंकी, 64, 02
1956, मेलबर्न, 59, 01
1960 ,रोम 45, 01
1964, टोकियो, 53, 01
1968, मेक्सिको सिटी, 25, 01
1972, म्युनिक, 46, 01
1976, मॉन्ट्रियल, 26, 00
1980, मॉस्को, 52, 01
1984, लॉस एंजेलिस, 47, 00
1988, सोल, 43, 00
1992, बार्सिलोना, 46, 00
1996, अटलांटा, 40, 01
2000, सिडनी, 44, 01
2004, अथेन्स, 73, 01
2008, बीजिंग, 57, 03
2012, लंडन, 83, 06
2016, रिओ डी जानेरो, 117, 02
2020, टोकियो, 126, 07
सहा ऑलिम्पिकमध्ये खातेही उघडता आले नाही…
भारताने आतापर्यंत 25 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. यापैकी सहा ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही पदक जिंकता आले नव्हते. 1920, 1924, 1976, 1984, 1988 आणि 1992 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही पदक जिंकता आले नाही. 1896 पासून आधुनिक ऑलिम्पिक खेळ आयोजित केले जात आहेत. तेव्हापासून जगाने अमेरिका, सोव्हिएत युनियन, ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या देशांना महासत्ता म्हणून पाहिले.





