IND vs PAK Match : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; युएईत ‘या’ दिवशी रंगणार थरार
IND vs PAK Match : आशिया कप २०२६ स्पर्धा २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत (UAE) पार पडणार आहे.

IND vs PAK Match On September 5 Womens Asia Cup 2026 Schedule Announced : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी ‘महिला टी-२० आशिया चषक २०२६’ (Womens Asia Cup 2026) स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ५ सप्टेंबर रोजी आमनेसामने येणार आहेत. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत (UAE) पार पडणार आहे.
२८ ऑगस्टपासून ८ संघांमध्ये रंगणार थरार!
महिला आशिया चषक स्पर्धेची ही सहावी आवृत्ती टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि युएई अशा एकूण ८ संघांचा सहभाग आहे. सध्या श्रीलंका संघ या स्पर्धेचा विद्यमान विजेता (Defending Champion) आहे. भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती असण्याची शक्यता असून लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाईल.
टीम इंडियाचे वेळापत्रक अन् ५ सप्टेंबरचा महामुकाबला!
भारतीय संघाचा समावेश ‘ग्रुप ए’ मध्ये करण्यात आला असून यात पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँग हे संघ आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध खेळणार आहे, तर दुसरा सामना ३ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध होईल.
भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता रंगणार सामना –
त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी (शनिवारी) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता रंगणार आहे. अलिकडेच झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, १३ सप्टेंबरला आशिया चषक संपल्यानंतर लगेचच १७ सप्टेंबरपासून जपानमध्ये ‘एशियन गेम्स’ सुरू होणार आहेत.




