Paris Olympics 2024 : भारताचा पदकांचा षटकार..! कुस्तीपटू अमन सेहरावतला 57 किलो वजनी गटात कांस्य…

Paris Olympics 2024 (Wrestling 57KG, Aman Sehrawat,Bronze Match) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (शुक्रवार,9 ऑगस्ट) भारताचा 14 वा दिवस आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण पाच पदके जमा झाली आहेत. त्यात भारताने नेमबाजीमध्ये तीन पदके, हॉकीमध्ये एक कांस्य पदक आणि ॲथलेटिक्समध्ये एक रौप्य पदक जिंकले आहे.
दरम्यान, कुस्तीमधून भारतासाठी आनंददायक बातमी समोर आली आहे. भारताच्या अमन सेहरावतने 57 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत विजय मिळवला आहे. यासह पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची पदकाची संख्या 06 झाली आहे.
सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने अमनला कांस्यपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली होती.त्याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डॅरियन तोई क्रूझ यालाा 13-5 अशा मोठ्या फरकाने पराभूत करून भारताचा झेंडा फडकवला आणि कांस्यपदक मिळवले. 2024 च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय दलात सामील झालेला अमन हा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता आणि त्याने ऑलिम्पिक पदार्पणात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
16 वर्षांचा वारसा जपला
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकपासून भारत प्रत्येक वेळी कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदके जिंकत आला आहे. 2008 मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर सुशीलने 2012 मध्ये आपल्या पदकाचा रंग बदलून सिल्व्हर केला आणि त्याच वर्षी योगेश्वर दत्तने कांस्यपदक जिंकले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकले आणि ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू देखील ठरली. 2020 मध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया आणि आता अमन सेहरावत यांनी हा वारसा कायम ठेवला आहे.
2008 बीजिंग ऑलिंपिक – सुशील कुमार (कांस्य)
2012 लंडन ऑलिंपिक – सुशील कुमार (रौप्य), योगेश्वर दत्त (कांस्य)
2016 रिओ ऑलिंपिक – साक्षी मलिक (कांस्य)
2020 टोकियो ऑलिम्पिक – रवी दहिया (रौप्य), बजरंग पुनिया (कांस्य)
2024 पॅरिस ऑलिम्पिक – अमन सेहरावत (कांस्य)
सेमीफायनलमध्ये हिगुची रे’ कडून पराभूत
भारताच्या अमन सेहरावतला 57 किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तांत्रिक श्रेष्ठतेवर त्याला जपानच्या अव्वल मानांकित ‘हिगुची रे’ याने पराभूत केले होते. पहिल्या फेरीत म्हणजे तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत, जपानी कुस्तीपटूने अमनचा पराभव केला आणि 10 गुण मिळवले आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सलग दोन विजयासह उपांत्यफेरीत मारली होती धडक…
तत्पूर्वी, अमन सेहरवतने पुरुषांच्या 57 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या अबाकारोव्ह झेलीमखानचा पराभव केला होता. अमनने हा सामना 12-0 ने जिंकला होता. त्याआधी, अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रतिस्पर्धी मॅसेडोनियाचा कुस्तीपटू व्लादिमीर एगोरोव्हला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. या लढतीत अमन सेहरावतने तांत्रिक श्रेष्ठतेवर व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 असा पराभव केला होता.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये याआधी भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूनेच सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. गुरूवारी तेराव्या दिवशी भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक तर गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.





