नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता भारतीय स्टार कुस्तीगीर अमन सेहरावतला भारतीय कुस्ती महासंघाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर, वजन मर्यादा पूर्ण करण्यास तो अपयशी ठरला होता. पुरुष गटाच्या फ्रीस्टाईलच्या ५७ किलो वजनी गटामध्ये तो पदकासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र, स्पर्धेच्या दिवशी त्याचे वजन मर्यादेपेक्षा १.७ किलोने जास्त भरल्याने, त्याला स्पर्धेतून थेट अपात्र करण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाने, झाग्रेब येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी चार प्रशिक्षक पाठवले होते. मात्र, चारही प्रशिक्षक, अमनच्या वजनाचे व्यवस्थापनाचे निरिक्षण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कुस्तीपटू अमनच्या बरोबरीने त्या चार प्रशिक्षकांना देखील कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. झालेला प्रकार हा अस्विकार्य असून यामागील कारणे शोधण्याची आवश्यकता आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीमध्ये आमच्या दोन कुस्तीगिरांना वाढलेल्या वजनामुळे स्पर्धेतून ते अपात्र ठरले आहेत. त्यामुळेच आम्ही कुस्तीपटू अमन सेहरावत व प्रशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता अमनच्या बरोबरीने मुख्य प्रशिक्षक जगमंदर सिंग, विनोद, वीरेंद्र आणि नरेंद्र या चारही प्रशिक्षकांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. महासंघाने अमन व प्रशिक्षकांना २७ सप्टेंबरपुर्वी नोटीशीला उत्तर देण्यासाठी सांगितले आहे.