Paris Olympics 2024 (Wrestling) : भारतासाठी आणखी एक निराशाजनक बातमी, कुस्तीपटू अंतिमला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का…

Paris Olympics 2024 (Wrestling,Women’s Freestyle 53kg, Antim Panghal) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा आज 12 वा दिवस आहे. आज वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्याकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची अपेक्षा असेल, तर ॲथलीट अविनाश साबळेही पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत आव्हान देईल.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला महिलांच्या 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेश फोगटचे वजन 50 किलो वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशला रात्री उशिरा सुवर्णपदकासाठी अंतिम सामना खेळायचा होता. नियमानुसार अपात्र ठरल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणतेही पदक जिंकता येणार नाही. याचा अर्थ अंतिम फेरीत पोहोचूनही विनेशला पदकाविना मायदेशी परतावे लागणार आहे.
असं असताना भारतासाठी कुस्तीमधून आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारतीय युवा कुस्तीपटू अंतिम पंघाल हिला महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व (Round of 16) फेरीत म्हणजेच पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. अंतिम पंघाल (Antim Panghal) हिची लढत तुर्कीच्या झेनेप येटगिल (Zeynep Yetgil) विरुद्ध होती. या लढतीत झेनेप हिने अंतिमचा 0-10 असा पराभव करत आगेकूच केली आहे.
Women’s Freestyle 53 kg Round of 16
Antim loses her Round of 16 match by technical superiority and a scoreline of 0-10 at the #Paris2024Olympics to Turkey’s 🇹🇷 Yetgil Zeynep.
Let’s cheer for our wrestlers, let’s #Cheer4Bharat! pic.twitter.com/pwZjO8idCr
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2024
पराभवानंतरही, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंतिम पंघालची मोहीम अजून संपलेली नाही. जर तुर्कीच्या झेनेप येटगिल हिने अंतिम फेरी गाठली तर तिला अजूनही रेपचेज फेरीत भाग घेण्याची संधी आहे. या फेरीव्दारे तीला कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळेल, पण यासाठी झेनेप येटगिल हिने अंतिम फेरी गाठणे गरजेचे आहे.
रेपचेज फेरीतील अपेक्षाही संपुष्टात….
हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अंतिम हिच्या रेपचेज फेरीतून कांस्यपदकासाठी लढत देण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. कारण अंतिमला पहिल्या सामन्यात पराभूत करणारी तुर्कीची कुस्तीपटू झेनेप येटगिल हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. जर्मनीच्या ॲनिका वेंडलकडून झेनेप येटगिल पराभूत झाली आहे.
रेपचेज म्हणजे काय…?
रेपचेज हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ बचाव असा होतो. रेपचेज हा एक असा नियम आहे, जो उप-उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीतील सामने हरल्यानंतरही कुस्तीपटूंना कांस्यपदक जिंकण्याची संधी उपलब्ध करून देतो. अंतिम फेरीत पोहोचलेल्या कुस्तीपटूंविरुद्ध पराभूत झालेले खेळाडू कांस्यपदक जिंकण्याचे दावेदार बनतात. कुस्तीमध्ये दोन कांस्यपदके दिली जातात. सुवर्ण आणि रौप्य पदकांची खात्री केवळ अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या कुस्तीपटूंनाच असते. उपांत्य फेरी गाठल्यानंतर कुस्तीतील कांस्यपदक निश्चित होत नाही .
उदा. समजा X कुस्तीपटूने उप-उपांत्यपूर्व फेरीत A ला, उपांत्यपूर्व फेरीत B ला आणि उपांत्यफेरीत C ला पराभूत केले. तर दुसरीकडे कुस्तीपटू Y ने वरीलप्रमाणे फेरीनुसार D,E आणि F यांना पराभूत केले . अशा परिस्थितीत X आणि Y हे कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहचतात. आणि पराभूत A,B,C,D,E,F हे सर्व कुस्तीपटू कांस्यपदकाचे दावेदार बनतात.
अशा परिस्थितीत प्रथम B चा सामना A शी आणि D चा सामना E शी होईल. यानंतर B आणि A यांच्यातील विजेत्याचा सामना C शी होईल. D आणि E यांच्यातील विजेत्याचा सामना F शी होईल. या दोन्ही साखळींमध्ये जे दोन खेळाडू शेवटी विजेते ठरतात त्यांना कांस्यपदके दिली जातात.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत आणि ही तिन्ही पदकं नेमबाजीत मिळाली आहे. यामध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.





