Bhairavnath Yatra – तळेगाव ढमढेरे गावात भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या यात्रेत भाविकांनी व ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व.समाजभूषण किसनभाऊ भुजबळ यांनी सुरू केलेल्या यात्रेचे यंदाचे ७४ वे वर्ष होते. (दि.१०) सकाळी श्री भैरवनाथ देवाचा अभिषेक झाला. सकाळी ८ वाजता बाजारपेठमार्गे छबिना काढण्यात आला. गावातील नागरिक व भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर यात्रा कमिटीची वतीने बैलगाड्यांचे भव्य आयोजन केले होते. दिवसभर विविध कार्यक्रमांनी यात्रेची रंगत वाढवली. रात्री पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्याने प्रेक्षकांची मने जिंकली. शनिवार (दि.११) सकाळी रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांची हजेरी संपन्न झाली. सायंकाळी आयोजित आखाड्यात परिसरातील नामांकित पैलवानांनी आपली ताकद, चपळाई व कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची दाद मिळवली. आखाड्यातील चुरशीच्या लढतींनी उपस्थितांना थरारक अनुभव दिला. यात्रेची सांगता रात्री ९ वाजता राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे व नितीन कुमार करवडीकर यांच्या लोकनाट्य कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमालाही प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ यांनी आभार मानले. कासारीतील भुजबळांचा गाडा प्रथम शर्यतीत 200 बैलगाड्यांनी सहभाग नोंदविला होता. 30 गाड्यांनी फायनलमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक सुखदेव ज्ञानोबा भुजबळ (कासारी), द्वितीय क्रमांक सागर शिवाजी गोरे व विलास मारुती कुटे (चाकण), तृतीय क्रमांक (स्व) बबनराव सदाशिव खेडकर (रांजणगाव गणपती), चतुर्थ क्रमांक सुनील जयवंत सातकर (तळेगाव ढमढेरे), पाचवा क्रमांक यशराज किरण पाचंगे व गणपत विष्णू खेडकर (रांजणगाव गणपती) यांनी पटकाविला.