Paris Olympics 2024 : यंदा ‘हे’ 21 नेमबाज साधणार पदकांवर निशाणा.! त्याआधी जाणून घ्या, ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांची कामगिरी…

Paris Olympics 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलैपासून महाकुंभ ऑलिम्पिकला सुरुवात होणार असून, त्यात भारतीय चाहत्यांनाही त्यांच्या खेळाडूंकडून मागच्या वेळेपेक्षा अधिक पदकांची अपेक्षा आहे. या वेळी, मागील सर्व ऑलिम्पिकच्या तुलनेत भारतातून पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारत आपली आतापर्यंतची सर्वात मोठी नेमबाजी तुकडी पाठवत आहे. एकूण 21 नेमबाज 27 पदकांसाठी स्पर्धा करतील. , ज्यामध्ये भारतीय नेमबाजांच्या तुकडीनंतर दुसरी सर्वात मोठी नेमबाजांची तुकडी ही चीनची आहे. चीन 22 नेमबाजांसह ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवत आहे.
काही खेळाडू असे आहेत की, ते वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये भाग घेताना देखील दिसतील. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून चांगली कामगिरी झाली नव्हती, पण यावेळी चित्र थोडे वेगळे असू शकते. भारतीय तुकडीत ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, सिफत कौर समरा, ईशा सिंग आणि अर्जुन बबुता यांसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश आहे, जे भारतासाठी पदक जिंकण्याच्या आपल्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.
‘या’ भारतीय नेमबाजांकडून सर्वाधिक अपेक्षा…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताकडून सहभागी होणाऱ्या नेमबाजांमध्ये असे काही नेमबाज खेळाडू आहेत ज्यांच्याकडून प्रत्येकाला पदक जिंकण्याची नक्कीच आशा आहे. यामध्ये मनू भाकरचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, ती 3 वेगवेगळ्या शूटिंग इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धेत यापूर्वीच सहभागी झालेल्या ऐश्वर्य, इलावेनिल, अंजुम यांच्याकडूनसुध्दा सर्वांना पदकाच्या अपेक्षा असतील. यावेळी भारतीय नेमबाजांना त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षकांनाही सोबत घेऊन जाण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, ज्यामध्ये प्रशिक्षकांना क्रीडा गावाऐवजी जवळच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय नेमबाज…
एलावेनिल वलारिवान आणि रमिता जिंदल – महिला 10 मी. एयर राइफल इवेंट
मनु भाकर आणि रिदम सांगवान – महिला 10 मी. एयर पिस्टल इवेंट
मनु भाकर आणि ईशा सिंह – महिला 25 मी. पिस्टल इवेंट
सिफ्त कौर सामरा आणि अंजुम मुद्गिल – महिला 50 मी. राइफल थ्री पोजिशन इवेंट
सरबजोत सिंह आणि मनु भाकर, अर्जुन सिंह चीमा आणि रिदम (जोडी) – 10 मी. एयर पिस्टल मिक्स्ड टीम इवेंट
सरबजोत सिंह आणि अर्जुन चीमा – पुरुष 10 मी. एयर पिस्टल इवेंट
संदीप सिंह आणि एलावेनिल, अर्जुन आणि रमिता (जोडी) – 10 मी. एयर राइफल मिक्स्ड टीम इवेंट
एश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि स्वप्निल कुसाले – पुरुष 50 मी राइफल थ्री पोजिशन इवेंट
अनीश भानवाला आणि विजयवीर सिंद्धू – पुरुष 25 मी. रैपिड फायर पिस्टल इवेंट
संदीप सिंह आणि अर्जुन बाबुता – पुरुष 10 मी. एयर राइफल इवेंट
नेमबाजीमध्ये भारताची ऑलिम्पिक पदके
भारताने नेमबाजीमध्ये एकूण 4 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत, ज्यात 1 सुवर्ण, 1 कांस्य आणि 2 रौप्य यांचा समावेश आहे. या खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा माजी नेमबाज अभिनव बिंद्रा हा एकमेव भारतीय आहे. बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारा राज्यवर्धन सिंग राठोड हा पहिला नेमबाज ठरला होता. 2004 अथेन्स गेम्समध्ये पुरुषांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताने नेमबाजीत 2 पदके जिंकली होती. भारतीय नेमबाजांनी एकाच आवृत्तीत एकापेक्षा जास्त पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. विजय कुमारने रॅपिड फायर पिस्तूल 25 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्याचवेळी गगन नारंगने 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला होता.
खेळातील प्रकार …
ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीचे तीन प्रकार आहेत, रायफल, पिस्तूल आणि शॉटगन. रायफल आणि पिस्तूल इव्हेंट शूटिंग रेंजवर होतात, जेथे ऍथलीट 10 मीटर, 25 मीटर आणि 50 मीटर अंतरावर लक्ष्यांवर शूट करतात. शॉटगन स्पर्धा तत्वतः वेगळ्या असतात कारण त्या बाहेर होतात. नेमबाज वेगवेगळ्या कोनातून आणि दिशांनी लक्ष्यांवर निशाणा साधतात . रायफल आणि पिस्तूल स्पर्धांमध्ये देखील तीन स्थान असतात: गुडघे टेकणे, जमिनीवर झोपून आणि उभे राहणे. काही स्पर्धेत सर्व प्रकाराचा समावेश होतो. निशाणा अचूकपणे आणि शक्य तितक्या केंद्राच्या जवळ लगावणे, नेमबाजाचे हे लक्ष्य असते.





