Paris Olympics 2024 (Table Tennis) : हरमीत देसाईने विजयासह केली मोहिमेची सुरुवात…

Paris Olympics 2024 (Table Tennis) : महाकुंभ ऑलिम्पिकचे यजमानपद यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराला देण्यात आले असून, त्यामध्ये 26 जुलै रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर आता 27 जुलैपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे.
भारतीय पुरुष एकेरीचा टेबल टेनिसपटू हरमीत देसाईने विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. टेबल टेनिस प्राथमिक फेरीत हरमीत देसाईने जॉर्डनचा खेळाडू झायेद अबो यामनला 4-0 असे सहज हरवून पुढची फेरी गाठली आहे.
एकूण 30 मिनिटे चाललेल्या या सामन्यात हरमीतने 11-7, 11-9, 11-5, 11-5 असा विजय मिळवला. यासह हरमीतने राउंड ऑफ 64 ची फेरी गाठली आहे. पुढील फेरीत मात्र त्याच्यासमोर अत्यंत अवघड आव्हान असणार आहे. त्याचा सामना यजमान फ्रान्सच्या तिसऱ्या मानांकित फेलिक्स लेब्रुन विरुद्ध होईल.
🇮🇳 Result Update: TABLE TENNIS MEN’S SINGLES PRELIMINARY ROUND👇@HarmeetDesai beats Jordan’s Zaid Abo Yaman 11-7, 11-9, 11-5 & 11-5 to qualify for the Round of 64. @ttfitweet pic.twitter.com/jf032nFkHd
— SAI Media (@Media_SAI) July 27, 2024
दरम्यान, नेमबाजीत मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेची अंतिम फेरीत गाठत भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. तिने तब्बल 20 वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर, याच स्पर्धेत सहभाग घेणारी दुसरी स्पर्धक रिदिमा सांगवान 15 व्या स्थानावर राहिली.
मनूच्या कामगिरीमुळे भारताला पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 2004 मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताची नेमबाज सुमा शिरुर 10 मीटर एअर पिस्टल महिला गटात अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नव्हते.





