Paris Olympics 2024 (Rowing) : बलराज पनवार रोईंग हीटमध्ये चौथ्या स्थानी, आता रेपेचेज फेरीव्दारे आगेकूच करण्याची संधी…

Paris Olympics 2024 : महाकुंभ ऑलिम्पिकचे यजमानपद यावेळी फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराला देण्यात आले असून, त्यामध्ये 26 जुलै रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर आता 27 जुलैपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. नेमबाजी व्यतिरिक्त रोइंग, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये भारत आज सहभागी होताना दिसणार आहे.
दरम्यान, रोईंग पुरुष एकेरी स्कल्स हिट्स (ओपनिंग रेस) फेरीत भारताकडून भाग घेतलेल्या बलराज पनवार या एकमेव अॅथलीटने 2000 मीटर शर्यत पूर्ण करण्यासाठी 7 मिनिटे 11 सेकंदांचा अवधी घेतला, ज्यासह तो चौथ्या क्रमांकावर राहिला. आता बलराज पनवार रविवार, 28 जुलै रोजी होणाऱ्या रेपेचेज फेरीत (Repechage Round) सहभागी होणार आहे. या फेरीचा सामना 28 जुलै रोजी दुपारी 1:06 वाजता सुरू होईल.
🚨 Rowing – A 4th place finish in the heats for Balraj Panwar. He will now compete in the repechage round. #JeetKiAur #Cheer4Bharat pic.twitter.com/lCahfS793X
— Team India (@WeAreTeamIndia) July 27, 2024
बलराज पनवार रोइंग स्पर्धेत थॉमस मॅकिन्टोश, स्टेफानोस अँटोन्सकोस आणि अब्देलखलेक एल्बाना यांच्यापेक्षा किंचित मागे राहिला. ज्यांनी त्यांची शर्यत अनुक्रमे सहा मिनिटे 55.92 सेकंद, सात मिनिटे 1.79 सेकंद आणि सात मिनिटे 5.06 सेकंदात पूर्ण केली. अशा प्रकारे या तिन्ही खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बलराजला थेट उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारता आली नसली तरी पण त्याला अजून एक संधी आहे. तो आता रेपेचेज फेरीमध्ये भाग घेणार आहे. रेपचेज फेरीच्या माध्यमातून बलराजला उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची दुसरी संधी मिळेल.
रेपेचेज फेरी म्हणजे काय?
रेपेचेज फेरी म्हणजे जे खेळाडू पहिल्या फेरीतील त्यांच्या अंतिम स्थानाच्या आधारे पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकत नाहीत त्यांना रेपचेज फेरीमध्ये भाग घेऊन उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याची दुसरी संधी दिली जाते म्हणजेच रेपेचेज ही एक अशी फेरी आहे, ज्यामध्ये सुरुवातीच्या फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी मिळते. रेपेचेज हे प्रामुख्याने कुस्तीशी संबंधित आहे. बीजिंग 2008 मध्ये थेट नॉकआऊट फॉरमॅट सुरू करण्यात आला होता तेव्हा ऑलिम्पिकमध्ये रेपेचेजचा प्रथम वापर करण्यात आला. तेव्हापासून हा फ्रीस्टाइल आणि ग्रीको-रोमन कुस्तीचा भाग आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकपासून अॅथलेटिक्समध्ये रेपचेजचा समावेश करण्यात आला आहे. 200 मीटर ते 1500 मीटर (हर्डल्स इव्हेंटसह) सर्व वैयक्तिक अॅथलेटिक्स ट्रॅक इव्हेंटमध्ये रेपचेज फेरीचा समावेश करण्यात आला आहे.



