Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राकडे मोठी जबाबदारी…

Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 28 सदस्यीय ऍथलेटिक्स संघाचे नेतृत्व करेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या आणि सध्याचा विश्वविजेता असलेल्या नीरजने पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी डायमंड लीगच्या अंतिम टप्प्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश…
भारतीय ॲथलेटिक्स संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे. चोप्रा व्यतिरिक्त, यामध्ये आशियाई क्रीडा चॅम्पियन अविनाश साबळे, तेजिंदरपाल सिंग तूर आणि धावपटू ज्योती याराजी यांसारख्या इतर प्रमुख खेळाडूंचाही समावेश आहे. पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघात मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे. या संघाने नुकतेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकन संघाला मागे टाकून खळबळ उडवून दिली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत.
पावो नुरमी खेळापासून नीरजनं तयारी केली सुरू..
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या महिन्यात पावो नूरमी गेम्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. नीरजने ऑलिम्पिकपूर्वी झालेल्या या स्पर्धेमध्ये 85.97 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेत आधी नीरज पिछाडीवर होता, पण तिसऱ्या प्रयत्नात त्याने शानदार पुनरागमन केले आणि आपली आघाडी शेवटपर्यंत राखण्यात यश मिळवले.
भारतीय ॲथलेटिक्स संघ खालीलप्रमाणे…
पुरुष : अविनाश साबळे (3,000 मीटर स्टीपलचेस), नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना (भालाफेक), तजिंदरपाल सिंग तूर (शॉट पुट), प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी), अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त (20 किमी चालणे), मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (4×400 मीटर रिले), मिजो चाको कुरियन (4×400 मीटर रिले), सूरज पनवार (मिश्र मॅरेथॉन चालणे), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी).
महिला : किरण पहल (400 मी. धावणे), पारुल चौधरी (3,000 मीटर स्टीपलचेस आणि 5,000 मीटर), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा शर्यत), अन्नू राणी (भालाफेक), आभा खटुआ (शॉट पुट), ज्योतिका श्री दांडी, सुभा व्यंकटेशन, विठिया रामराज, पूवम्मा एमआर (4x400m रिले), प्राची (4x400m रिले), प्रियंका गोस्वामी (20 किमी चालणे).





