ICC Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये 1 मार्चला होणार भारत विरूध्द पाकिस्तान लढत? पीसीबीकडून वेळापत्रक तयार…

ICC Champions Trophy 2025 (IND vs PAK) : – भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना हा क्रिकेट विश्वातील एक हायव्होल्टेज सामना असतो. आयसीसी स्पर्धा वगळता भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकिस्तानला नमवले आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. दरम्यान, या दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा ही मोठी लढत पाहायला मिळणार आहे.
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सामन्याबाबत पीसीबीने वेळापत्रक तयार केले असून भारत पाकिस्तान सामन्याची तारीखही निश्चित केली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या वेळापत्रकाचा मसुदा तयार केला आहे आणि तो आयसीसीला सादर केला आहे. यावेळी पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले आहे. पीसीबीने या वेळापत्रकात १ मार्च २०२५ रोजी लाहोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना निश्चित केला आहे. मात्र, त्यात सहभागी होण्यासाठी आणि भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाही.
ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत होणार आहे. १० मार्च हा राखीव दिवस आहे. म्हणजेच अंतिम फेरीसाठी आणखी एक दिवस ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना टी-२० विश्वचषक अंतिम लढचीसाठी बार्बाडोसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांनी १५ सामन्यांचे वेळापत्रक आयसीसी समोर सादर केले आहे. या वेळापत्रकातील भारतीय संघाचे सर्व सामने सुरक्षेच्या कारणास्तव लाहोरमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पीसीबीने १५ सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक सादर केले आहे. त्यानुसार लाहोरमध्ये ७, कराचीमध्ये ३ आणि रावळपिंडीमध्ये ५ सामने खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी कराचीमध्ये सुरू होईल, तर दोन उपांत्य फेरीचे सामने कराची आणि रावळपिंडी येथे होतील. तर अंतिम सामना लाहोर येथे होणार आहे.
T20 World Cup 2024 : टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर काय-काय झालं? पहा, सर्व फोटो एका क्लिकवर…
भारत-पाकिस्तान एकाच गटात
भारताचे उपांत्य फेरीसह सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे. या दोन संघांशिवाय बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघही आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. पाकिस्तानने २०२३ मध्ये आशिया चषक सामन्यांचे आयोजन केले होते, जो हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवला गेला होता. या आशिया चषकतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. भारत सरकारने खेळाडूंना पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने हे करण्यात आले. बीसीसीआय वगळता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या देशांच्या सर्व मंडळांच्या प्रमुखांनी, त्यांनी त्यांच्या वेळापत्रक मसुद्याचे समर्थन करण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर आता बीसीसीआय भारत सरकारबरोबर चर्चा करून काय निर्णय घेणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.





