National Sports Day : खेळातून आत्मविश्वास… आत्मविश्वासातून आत्मनिर्भरता!
आजच्या विद्यार्थ्याचे जग वेगाने बदलत आहे. हातात पुस्तकाबरोबर मोबाइल आला आहे, वर्गाबरोबर डिजिटल स्क्रीन आली आहे आणि अभ्यासाच्या स्पर्धेबरोबर अपेक्षांचे ओझेही वाढले आहे.

National Sports Day : आजच्या विद्यार्थ्याचे जग वेगाने बदलत आहे. हातात पुस्तकाबरोबर मोबाइल आला आहे, वर्गाबरोबर डिजिटल स्क्रीन आली आहे आणि अभ्यासाच्या स्पर्धेबरोबर अपेक्षांचे ओझेही वाढले आहे. या बदलत्या जीवनशैलीत एक गोष्ट मात्र हळूहळू दूर जात आहे. ती म्हणजे मोकळे मैदान. विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाइल काही काळ बाजूला ठेवून त्यांच्या पायांना पुन्हा मैदानाची वाट दाखवणे ही आजची खरी गरज आहे.
खेळ हा केवळ मनोरंजनाचा किंवा पदक जिंकण्याचा विषय नाही. खेळ विद्यार्थ्याला शिस्त शिकवतो, वेळेचे महत्त्व समजावतो, पराभव स्वीकारण्याची ताकद देतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द निर्माण करतो. संघामध्ये खेळताना सहकार्य, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि इतरांचा आदर या मूल्यांची रुजवण होते. म्हणूनच शिक्षण आणि क्रीडा यांना एकमेकांपासून वेगळे न पाहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दोन समान आधारस्तंभ म्हणून पाहण्याची गरज आहे.
आज अनेक पालकांसाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप प्रामुख्याने गुणांवर केले जाते. चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे आहेच. मात्र, निरोगी शरीर, स्थिर मन, आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये यांशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. नियमित खेळणारा विद्यार्थी केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहात नाही, तर त्याची एकाग्रता, आत्मविश्वास आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमतादेखील विकसित होते.
महाराष्ट्राने क्रीडाक्षेत्रात मोठी परंपरा निर्माण केली आहे. कबड्डी, खो-खो, कुस्ती, हॉकी, क्रिकेट, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण अशा अनेक खेळांमध्ये राज्याने गुणवंत खेळाडू घडवले आहेत. शासनाच्या विविध क्रीडा योजना, क्रीडा संकुले, प्रशिक्षण केंद्रे आणि शालेय स्पर्धांच्या माध्यमातून क्रीडेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही या सुविधा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत समान प्रमाणात पोहोचणे हे अजूनही मोठे आव्हान आहे.
ग्रामीण गुणवत्तेला संधी मिळावी
विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्रीडा क्षमता असते. मात्र, योग्य प्रशिक्षक, मैदान, साहित्य, प्रवासाची सुविधा किंवा आर्थिक मदत नसल्यामुळे अनेक प्रतिभा सुरुवातीलाच थांबतात. त्यामुळे तालुका आणि जिल्हास्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे, प्रशिक्षित मार्गदर्शक, आवश्यक क्रीडा साहित्य, पोषण सहाय्य आणि स्पर्धांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
शहरी भागातील आणखी एक समस्या म्हणजे मैदानांची कमतरता. प्रत्येक शाळेकडे स्वतंत्र मैदान असणे शक्य नसेल, तर स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालये आणि क्रीडा संस्थांच्या सहकार्याने सामायिक क्रीडा सुविधा विकसित करता येतील. ‘एक शाळा-एक क्रीडांगण’ ही संकल्पना शक्य तिथे राबविण्याबरोबरच उपलब्ध सार्वजनिक मैदानांचा विद्यार्थ्यांसाठी नियोजित वापर सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
पुस्तकासह क्रीडा साहित्यही हाती असावे
विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक असायलाच हवे; पण त्याचबरोबर खेळाचे साहित्यही असायला हवे. वर्गखोली आवश्यक आहेच; पण मोकळे मैदानही तितकेच आवश्यक आहे. गुणांची स्पर्धा असावी, पण आरोग्य, आत्मविश्वास, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचीही स्पर्धा असावी. आज मैदानावर घाम गाळणारा विद्यार्थी उद्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची अधिक ताकद घेऊन उभा राहील.
म्हणून क्रीडाक्षेत्र शिक्षणाच्या काठावर ठेवण्याऐवजी शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणून ठेवण्याची वेळ आली आहे. सक्षम विद्यार्थी घडला तर सक्षम युवक घडेल; सक्षम युवक घडला तर सक्षम समाज आणि सक्षम महाराष्ट्र घडेल. खेळातून आत्मविश्वास, आत्मविश्वासातून आत्मनिर्भरता आणि आत्मनिर्भरतेतून सशक्त समाज हीच आजच्या पिढीसाठी आणि महाराष्ट्रासाठी आवश्यक दिशा आहे.
मुलींसाठीही सुविधांची निर्मिती आवश्यक
मुलींच्या दृष्टिकोनातून क्रीडाक्षेत्राकडे ही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सुरक्षित मैदान, स्वच्छतागृहे, महिला प्रशिक्षक, सुरक्षित प्रवास आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या तर अधिक मुली आत्मविश्वासाने क्रीडा क्षेत्रात पुढे येऊ शकतील. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ मैदान, विशेष क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षित प्रशिक्षक उपलब्ध करून देणे ही समावेशक समाजाची जबाबदारी आहे. क्रीडा आणि करिअर यांचा संबंध विद्यार्थ्यांना स्पष्टपणे समजावून सांगण्याचीही गरज आहे. खेळाडू होण्याबरोबरच क्रीडा प्रशिक्षण, फिटनेस, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, फिजिओथेरपी, स्पोर्ट्स सायन्स, योग, क्रीडा पत्रकारिता आणि उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांत संधी निर्माण होत आहेत.
योग्य वेळी मिळालेले करिअर मार्गदर्शन अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि क्षमतेचे क्षेत्र निवडण्यास मदत करू शकते. याच व्यापक दृष्टिकोनातून रिलाइव्ह फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या सक्षमीकरणाकडे पाहते. शिक्षणासोबत कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, प्रेरणा व समुपदेशन, उद्योजकता विकास आणि आत्मनिर्भरतेच्या संधी निर्माण करणे हा फाउंडेशनच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. या सक्षमीकरणाच्या प्रवासात क्रीडाक्षेत्र हा प्रभावी घटक ठरू शकतो.
योग्य मार्गदर्शन गरजेचे
खेळातून निर्माण होणारा आत्मविश्वास पुढे शिक्षणात, करिअरमध्ये आणि जीवनातील निर्णयांमध्ये उपयोगी पडतो. म्हणूनच विद्यार्थ्यांची क्रीडा क्षमता ओळखणे, त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, क्रीडा शिबिरे व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम राबवणे आणि खेळातून उपलब्ध होणार्या करिअरच्या संधींची माहिती देणे, हे सामाजिक संस्थांसाठी महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते. विशेषतः संधींपासून वंचित विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रयत्न पोहोचणे अधिक आवश्यक आहे. फाउंडेशनचा दृष्टिकोन केवळ खेळाडू घडविण्यापुरता मर्यादित नसून खेळातून सक्षम व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आहे.
कारण आत्मविश्वास, शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची वृत्ती हीच पुढे आत्मनिर्भरतेची पायाभरणी करते. ‘खेळा, शिका आणि सक्षम व्हा’ ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजविणे ही भविष्यातील समाजनिर्मितीची महत्त्वाची दिशा ठरू शकते. यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालये, पालक, प्रशिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगक्षेत्र यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. ’सीएसआर’च्या माध्यमातून मैदानांचा विकास, क्रीडा साहित्य, प्रशिक्षण केंद्रे, शिष्यवृत्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देता येईल. योजनांची संख्या वाढविण्यापेक्षा त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे.





