National Sports Day : खेळाडू घडविण्याची 25 वर्षांची तपश्चर्या; ‘श्री समर्थ’ची गुणवत्तापूर्ण वाटचाल…
अकॅडमीचे संस्थापक श्रीकांत निंबाळकर यांचा स्वतःचा क्रीडा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या वाटचालीचा महत्त्वाचा आधार ठरला.

National Sports Day : अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात 1998 मध्ये सुरू झालेला एक छोटासा प्रयत्न आज महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार्या प्रवासात रूपांतरीत झाला आहे. क्रिकेटच्या मैदानावर कौशल्य, शिस्त आणि मेहनतीला प्राधान्य देतानाच खेळाडूंच्या शैक्षणिक प्रगतीलाही तितकेच महत्त्व देणारी ‘श्री समर्थ क्रिकेट अॅकॅडमी’ आज रौप्यमहोत्सवी वाटचालीचा अभिमान बाळगते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील दिग्गज फ्रँक टायसन यांच्यासह अनेक नामवंत प्रशिक्षक आणि खेळाडूंचे मार्गदर्शन, शेकडो खेळाडूंचा सराव आणि विविध प्रतिष्ठित स्पर्धांतील विजेतेपदे, अशा समृद्ध वारसातून या अॅकॅडमीने नगरच्या क्रिकेटला नवी दिशा दिली.
प्रा.‘श्रीकांत दत्तात्रय निंबाळकर’
अॅकॅडमीची सुरुवात ऑक्टोबर 1998 मध्ये वाडिया पार्क मैदानावर झाली. अहमदनगर कॉलेजचे प्रा. श्रीकांत दत्तात्रय निंबाळकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्व. आमदार अरुणकाका जगताप यांचे मार्गदर्शन व आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्याने अकादमीने मोठी वाटचाल केली आहे. अहमदनगर कॉलेजच्या क्रिकेट संघाचा सराव सुरू असताना त्याच काळात कॉलेजच्या 19 वर्षांखालील संघाने शालेय स्पर्धेत यश मिळवत विभागीय स्तरावर मजल मारली. त्यातून खेळाडूंमध्ये अधिक चांगल्या मार्गदर्शनाची गरज जाणवली. हीच गरज लक्षात घेऊन शालेय आणि महाविद्यालयीन खेळाडूंना क्रिकेटचे मूलभूत ज्ञान, तंत्र आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने अकॅडमीची सुरुवात झाली.
अकॅडमीचे अध्यक्ष पोपट पवार, उपाध्यक्ष डॉ. अविनाश मोरे व सचिव श्रीकांत निंबाळकर यांमुळे अकादमीचा जिल्ह्यात नावलौकिक वाढला आहे. या प्रवासात मंदार क्षीरसागर, विनित म्हस्के, विवेक म्हस्के, प्रीतम मुथा, जुनेद खान, महेश काळे, गोविंद चव्हाण यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. सुरुवातीला आसपासच्या शाळांमधून काही खेळाडू अकॅडमीशी जोडले गेले. संख्या वाढत गेली तसे सरावातील गांभीर्य आणि स्पर्धात्मकता वाढली. शालेय आणि महाविद्यालयीन वयोगटातील 18-19 वर्षांचे खेळाडू स्थानिक खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये नामांकित संघांना आव्हान देऊ लागले. सुरुवातीला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा संघ पुढे विविध स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचू लागला आणि विजेतेपदांवर नाव कोरू लागला. यामध्ये अजय घोडके, धीरज आव्हाड, सौरभ शिंगवी, संदीप अडोळे, सनी मुथा, रौनक खंडेलवाल यांनी दमदार कामगिरी केली.
‘पण शिक्षणही तितकेच महत्त्वाचे’
क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी पालक आणि खेळाडू मोठ्या प्रमाणावर वेळ, पैसा आणि मेहनत खर्च करतात. मात्र या धावपळीत शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, हा निंबाळकरांचा ठाम आग्रह आहे. क्रिकेटचा आनंद घ्या, त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करा; मात्र त्याचवेळी शैक्षणिक गुणवत्तेकडेही गांभीर्याने पाहा, असा त्यांचा संदेश आहे. मैदानावर विजय मिळविणे महत्त्वाचे असले, तरी आयुष्याच्या मोठ्या सामन्यासाठी शिक्षणाचा पाया भक्कम असणे तितकेच गरजेचे आहे. क्रिकेटमधील चढ-उतारांना सामोरे जाताना शिक्षण आत्मविश्वास आणि पर्यायी वाटचालीची ताकद देते.
हाच विचार केंद्रस्थानी ठेवून ‘श्री समर्थ क्रिकेट अकॅडमी’ची वाटचाल सुरू आहे. वाडिया पार्कच्या मैदानावर काही खेळाडूंपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक खेळाडूंच्या स्वप्नांना आकार देत आहे. सात क्रॉम्प्टन ट्रॉफी, विविध स्पर्धांतील विजेतेपदे आणि महाराष्ट्राच्या विविध संघांमध्ये प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू ही या वाटचालीची फलश्रुती आहे. मात्र या यशापेक्षाही ‘खेळाडू घडविणे आणि त्याचबरोबर माणूस घडविणे’ हीच ‘श्री समर्थ’ची खरी ओळख ठरते.
एमपीएलमधील गगनभरारी…
याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘श्री समर्थ’ची ओळख केवळ प्रशिक्षण केंद्र म्हणून राहिली नाही, तर खेळाडू घडविणारी संस्था म्हणून निर्माण झाली. प्रतिष्ठित क्रॉम्प्टन ट्रॉफीवर अकॅडमीने तब्बल सात वेळा विजेतेपद मिळविले असून दोन वेळा उपविजेतेपदही पटकावले आहे. हिवाळे ट्रॉफी दोन वेळा, मेहेर बाबा ट्रॉफी चार वेळा, मुन्ना पवार ट्रॉफी तीन वेळा, हुंडेकरी ट्रॉफी दोन वेळा, पुणतांबा ट्रॉफी, राष्ट्रवादी टी-20 ट्रॉफी, तिरमल ट्रॉफी तसेच बाळासाहेब पवार ट्रॉफीच्या विविध वयोगटातील विजेतेपदांनी अकॅडमीच्या यशाची भक्कम नोंद केली आहे.
पहिल्याच एमपीएल स्पर्धेत अकॅडमीच्या सात खेळाडूंना स्थान मिळाले होते. महाराष्ट्राच्या विविध वयोगटांतील संघांमध्ये प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू अकॅडमीने घडविले. अनुपम संकलेचा, प्रीतम मुथा, साजिद खान, रोहन मुथा, श्रीपाद निंबाळकर, सौरभ शिंगवी, मनीष मुथा, आकाश थोरात, विवेक व विनीत म्हस्के, शुभम ढवळे, अमन बोडके, सरफराज बांगडीवाला, रोहित बेरड, रौनक खंडेलवाल, संदीप आटोळे यांसारख्या खेळाडूंनी विविध स्तरांवर आपल्या कामगिरीची छाप उमटविली.
दिग्गजांकडून शिकण्याची संधी
अकॅडमीचे संस्थापक श्रीकांत निंबाळकर यांचा स्वतःचा क्रीडा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या वाटचालीचा महत्त्वाचा आधार ठरला. क्रिकेटसह खो-खो, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल आणि हॉकी या खेळांचा अनुभव असलेल्या निंबाळकरांनी नगरमध्ये झहीर खान, सुनील भगत, सुरेंद्र शिंदे, पद्मश्री पोपटराव पवार यांसारख्या खेळाडूंबरोबर खेळताना मिळालेला अनुभव प्रशिक्षणात उपयोगात आणला. एम.ए., एम.पी.एड. शिक्षण घेतल्यानंतर अहमदनगर कॉलेजमध्ये कार्यरत असताना त्यांनी जिल्हा तसेच राज्यस्तरीय विविध निवड समित्यांवर काम केले. जिल्हा संघांसोबत मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली.
महाराष्ट्र शालेय समिती आणि राज्य निवड समितीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या प्रशिक्षण कार्यशाळांमुळे प्रशिक्षणातील आधुनिक पद्धती आत्मसात करण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियन स्कूल क्रिकेटचे हेड कोच व डायरेक्टर फ्रँक टायसन, कसोटीपटू बलविंदरसिंग संधू, कानिटकर, चंदू बोर्डे आणि वायंगणकर यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शनही अकॅडमीला लाभले. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा सातत्याने उंचावत गेला. प्रा. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संकलेचा, बाटलीवाल, आटोळे यांनी स्वतंत्र अकादमीची स्थापना केली आहे.






