Paris Olympics 2024 (Men’s Javelin Throw) : किशोर जेनाची निराशजनक कामगिरी, अंतिम फेरी गाठण्यात आलं अपयश…

Paris Olympics 2024 (Men’s Javelin Throw) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी आज (06 ऑगस्ट) 11 वा दिवस आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने पात्रता फेरीत पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. नीरजने पहिलाच थ्रो 89.43 मी. लांब टाकला आहे. पात्रता स्पर्धेत अव्वल 12 मध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. तसेच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 84 मीटर भाला फेकणे बंधनकारक होते.
नीरजचा पात्रता फेरीसाठी ‘ब’ गटात समावेश आहे. नीरजप्रमाणेच ‘ब’ गटातील पाकिस्तानचा अर्शद नदीमही पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अर्शदने त्याच्या प्रयत्नात 86.59 मीटर भाला फेकला. अर्शदची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. दुसरीकडे भालाफेकमध्ये भारताचा दुसरा खेळाडू किशोर जेनाला भालाफेकच्या अंतिम फेरीत स्थान पटकावता आले नाही. जेनाने 80.83 च्या सर्वोत्तम थ्रोसह ही फेरी पूर्ण केली. पात्रता फेरीत तो 9व्या क्रमांकावर राहिला. आता भालाफेकीत पदकाच्या आशा नीरज चोप्रावर आहेत.
भालाफेक स्पर्धेत ‘ब’ गटातील भारताचा भालाफेकपटू किशोर जेना याला तीनही प्रयत्नांनंतरही अंतिम फेरीसाठी पात्र होता आले नाही. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 84 मीटर भाला फेकणे बंधनकारक होते. पहिल्याच प्रयत्नात त्याने 80.73 मीटर लांब भाला फेकला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने फाऊल केला. त्यानंतर तिसऱ्या फेरीत किशोरला केवळ 80.21 मीटर लांब भाला फेकता आला. म्हणजेच त्याने पहिल्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो(भालाफेक) केला.
पात्रता निष्कर्ष…
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकुण 32 भालाफेकपटू पात्र ठरले आहेत. त्यांची प्रत्येकी 16 अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. 32 मधील 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. पात्रता मानक 84 मीटरवर सेट केले आहे, याचा अर्थ 84 मीटर भाला फेकणारा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.मात्र 84 मीटर अंतर भाला फेकण्यास खेळाडू पात्र ठरले नाही तर अंतरानुसार 12 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे अंतिम फेरीत प्रवेश करणार आहेत.





