Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये दिसणार ‘आजीबाई’, वयाच्या 58व्या वर्षी ‘ही’ खेळाडू करणार पदार्पण…

Paris Olympics 2024, Zhiying Zeng Olympic Debut at 58 : ऑलिम्पिकचा इतिहास खूप जुना आहे. या खेळातील अनेक प्रेरणादायी कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुन्हा एकदा काहीतरी नवीन आणि प्रेरणादायी पाहायला मिळणार आहे. वास्तविक, 58 वर्षीय महिला खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. झियिंग झेंग (Zhiying Zeng) असे या महिला खेळाडूचे नाव आहे. त्या टेबल टेनिसपटू आहेत. झियिंग झेंग या एके काळी चिनी ॲथलीट होत्या, पण काही कारणास्तव त्या नंतर चिलीमध्ये स्थायिक झाल्या आणि तिथल्या ॲथलीट बनल्या.
निवृत्तीनंतर क्रीडा क्षेत्रात जबरदस्त पुनरागमन…
वयाच्या 58 व्या वर्षी टेबल टेनिसपटू झियिंग झेंग यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्या पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. झियिंग झेंग यांच्यासाठी ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे, ज्यांनी काही वर्षांपूर्वी व्यावसायिक टेबल टेनिसमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी एकटीने घरात टेबल टेनिस खेळून आपला उत्साह कायम ठेवला. लॉकडाऊन संपल्यावर त्यांनी स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्या सर्व स्पर्धेत सहज जिंकत गेल्या. 2023 पर्यंत, त्या देशातील सर्वोच्च महिला खेळाडू बनल्या आणि चिली राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरल्या.
झियिंग झेंग चीन सोडून बनली चिलीची खेळाडू…
झियिंग झेंग यांचा जन्म 1966 मध्ये चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात झाला. त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या बालपणातच प्रशिक्षण दिले आणि त्यांची प्रतिभा लवकरच उदयास आली. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांची बीजिंगमधील ज्युनियर एलिट संघासाठी निवड झाली. 1983 पर्यंत, झियिंग झेंग यांची चीनच्या राष्ट्रीय टेबल टेनिस संघासाठी निवड झाली आणि त्यावेळी त्यांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. पण 1986 मध्ये सुरू झालेल्या “टू-कलर रूल” मुळे त्याच्या खेळाला फटका बसला आणि त्यांनी राष्ट्रीय संघ सोडला.
1989 मध्ये एका चिनी प्रशिक्षकाने त्यांना चिलीमध्ये शालेय मुलांना प्रशिक्षण देण्याची नोकरी देऊ केली. झियिंग झेंग यांनी चिलीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्या चीनी वस्तूंच्या आयात व्यवसायात गुंतल्या. साल 2002 मध्ये, झेंगने त्यांच्या मुलाची व्हिडिओ गेमची सवय दूर करण्याकरिता पुन्हा टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली आणि त्यासोबतच त्यांनी टेबल टेनिसमध्ये सरस कामगिरी करताना स्थानिक स्पर्धेत भाग घेत दमदार यश मिळवले आणि त्या अशाप्रकारे चिली राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरल्या.





