Paris Olympics 2024 : भारताच्या ऑलिम्पिक संघात मोठा बदल, मेरी कोमची जागा घेणार अनुभवी नेमबाज; पी.व्ही. सिंधू असेल महिला ध्वजवाहक…

India at Paris Olympics 2024 : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) सोमवारी गगन नारंग याची भारतीय दलाचे शेफ-डी-मिशन म्हणून नियुक्ती केली आहे. लंडन ऑलिम्पिकच्या नेमबाजी स्पर्धेत गगन नारंग कांस्यपदक विजेता होता आणि त्याने मेरी कोमची जागा शेफ-डी-मिशन म्हणून घेतली आहे. शेफ-डी-मिशन म्हणजे गगन नारंग आता भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय ध्वजधारकांचीही घोषणा करण्यात आली आहे. स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात महिला ध्वजवाहक असेल, तर दुसरीकडे पुरुषांमध्ये ही जबाबदारी टेबल टेनिसचा महान खेळाडू ए शरथ कमल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
वास्तविक, मेरी कोमची सुरुवातीला शेफ-डी-मिशन या पदासाठी निवड झाली होती, परंतु यावर्षी एप्रिलमध्ये मेरी कोमने काही कारणांमुळे ही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. यावर IOA अध्यक्ष पीटी उषा यांनी एक निवेदन जारी केले की , मी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूच्या शोधात होते. गगन नारंग हा मेरी कोमचा सर्वोत्तम रिप्लेसमेंट आहे असे मला वाटते. पीव्ही सिंधू आणि ए शरथ कमल हे उद्घाटन समारंभात भारतीय दलाचे ध्वजवाहक असतील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.
Press Release 🚨 pic.twitter.com/hRv5iuTGnU
— Team India (@WeAreTeamIndia) July 8, 2024
कधी सुरू होतील खेळ?
पॅरिस ऑलिम्पिक खेळ 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टला संपणार आहेत. या खेळांमध्ये 196 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ऑलिम्पिकमधील 28 खेळ हेच असतील जे २०१६ आणि २०२० च्या खेळांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पण स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग यासारखे काही नवीन खेळ ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत.
भारताचे सर्वात मोठे पथक…
आत्तापर्यंत भारतातील एकूण 125 खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताचे हे सर्वात मोठे पथक असेल. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचा समावेश आहे, ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. आतापर्यंत, नेमबाजी, ऍथलेटिक्स, कुस्ती, बॉक्सिंग, तिरंदाजी, सेलिंग, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन यासह 16 खेळांमधील भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.





