Parali Shiva Temple : परळीच्या प्राचीन शिवमंदिरांचा कायापालट होणार; शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश..काय बदलणार?
Parali Shiva Temple : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धाराला मान्यता; पुरातन कोरीव कामाचे जतन होणार.

Parali Shiva Temple – परळी (ता. सातारा) येथे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन केदारेश्वर व महादेव मंदिर या दोन शिवमंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून ६ कोटी ५४ लाख ३० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
निधी मंजूर केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना. श्रीमती सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. परळी येथे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील केदारेश्वर व महादेव मंदिर ही दोन मंदिरे १३ ते १४ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. या दोन्ही मंदिरात सुंदर कोरीव काम असून मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात.
सद्यस्थितीत मंदिरांची देखभाल न झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक, धार्मिक, पुरातन ठेवा जतन करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष प्रयत्न व पाठपुरावा सुरु होता. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे व लेणी यांचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने गठित केलेल्या समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत परळी येथील केदारेश्वर व महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडील अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यास मान्यता दिली होती.
त्यानुसार राज्य सरकारने या कामासाठी ६ कोटी ५४ लाख ३० हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंजूर निधीमधून या मंदिरांच्या जीर्णोद्धारासह विविध विकासात्मक कामे केली जाणार आहेत. केदारेश्वर व महादेव मंदिर हा पुरातन ऐतिहासिक, धार्मिक अनमोल ठेवा जतन व संवर्धन करण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध झाल्याबद्दल परळी खोऱ्यातील जनतेसह राज्यभरातील भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





