पंकजा मुंडेंनी घेतली डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट; न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी

Pankaja Munde | सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. यात तिने पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
याप्रकरणी थेट पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांवरच आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेनंतर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतंच त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. याप्रकरणी पंकजा मुंडे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत.
पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पंकजा मुंडे यांनी डॉक्टर तरुणीच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी आई-वडिलांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. डॉक्टर तरुणीचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. तिला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात त्यांनी कुटुंबाला दिलासा दिला. Pankaja Munde |
📍कवडगाव ता. वडवणी.
सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डाॅ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची आज कवडगाव ता. वडवणी येथे जाऊन भेट घेतली व आई-वडिलांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. डाॅ संपदा यांचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी… pic.twitter.com/jgbQEETbJr— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 25, 2025
निःपक्ष आणि लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी
यावेळी पंकजा मुंडे यांनी साताराचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन करून मृत्यू प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची निःपक्ष आणि लवकरात लवकर चौकशी करुन डॉ. संपदा आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
गोपाळ बदने पोलिसांना शरण
दरम्यान, या प्रकरणातील एका आरोपीला प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवरून ताब्यात घेतले आहे, आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पोलीस अधिकारी गोपाळ बदने पोलिसांना गुंगारा देत होता, अखेर तो स्वतः काल रात्री उशिरा फलटण पोलिसांना शरण आला आहे. Pankaja Munde |
हेही वाचा :





