Purandar : पांडुरंग पालखी सोहळा वाल्ह्यात विसावला
Purandar : यावेळी पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख मेघराज वळके पाटील, सोहळा मार्गदर्शक विठ्ठल दादा वासकर, देवस्थान पुजारी कुलदीप कुलकर्णी, शुभम कोळी, सागर साळुंखे, नारायण देवकाते आदींसह वैष्णव उपस्थित होते.

वाल्हे : “धन्य धन्य ज्ञानेश्वरा, अलंकापुरी समाधी स्थिरा… कृष्ण पक्षी तुझ निर्धारा, मी भेटी देत जाईल…” ही भावना मनात ठेवून कपाळी बुक्का-गंध, खांद्यावर भगव्या पताका आणि मुखी ‘ज्ञानबा-तुकाराम’चा जयघोष करीत हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत श्री पांडुरंग पालखी सोहळा शनिवारी (दि. २८) आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्हे नगरीत विसावला.
यावेळी पांडुरंग पालखी सोहळा प्रमुख मेघराज वळके पाटील, सोहळा मार्गदर्शक विठ्ठल दादा वासकर, देवस्थान पुजारी कुलदीप कुलकर्णी, शुभम कोळी, सागर साळुंखे, नारायण देवकाते आदींसह वैष्णव उपस्थित होते. दरम्यान पांडूरंग महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत वाल्हेकर ग्रामस्थांच्या वतीने, सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच सागर भुजबळ यांनी केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, ह.भ.प. अतुल नाझरे, ह.भ.प.अशोक महाराज पवार, मयुरी भुजबळ, सुरेश पवार, प्रवीण शिंदे,रणजित भुजबळ, दत्ता पवार, सागर पवार आदींसह ग्रामस्थांनी स्वागत केले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानदेव-तुकारामांच्या जयघोषाने संपूर्ण पालखीतळ भक्तिमय झाला होता. समाजआरतीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार (दि. २९) पहाटे तीन वाजता पालखी सोहळा सासवड मुक्कामी मार्गस्थ होणार असल्याची माहिती सोहळा संपर्कप्रमुख मेघराज वळके-पाटील यांनी दिली.
वैष्णवांसाठी टँकरची व्यवस्था
पालखी सोहळ्यासाठी पंढरपूर ते आळंदी या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सोहळा मालक नामदास महाराज यांनी दिली. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप, हवालदार भाऊसाहेब भोंगळे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.
रेल्वे भुयारी मार्गात अंधार
पांडुरंग पालखी सोहळा सुकलवाडी फाट्यावरून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदानाकडे जात असताना रेल्वेच्या भुयारी मार्गात पूर्णपणे अंधार होता. प्रशासनाकडून या ठिकाणी विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली नसल्याने वैष्णवांना मार्गस्थ होताना अडचणींचा सामना करावा लागला. या गैरसोयीबाबत वैष्णवांनी नाराजी व्यक्त केली.





