Panchayat Samiti Reservation : पंचायत समिती सभापतिपदांसाठी सोमवारी सोडत

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांच्या सभापतिपदांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. सोमवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ही प्रक्रिया पार पडेल. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पहिल्या टप्प्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गट-गण अंतिम झाल्यानंतर शासनाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले असून, नाशिकचे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे.
आता पंचायत समिती सभापतिपदांच्या सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार सभापतिपदाची सोडत जाहीर केली आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि विमुक्त जाती-भटक्या जमातीतील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
चार पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव –
अंशतः अनुसूचित क्षेत्रात असलेल्या आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या पंचायत समित्यांमध्ये सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. यामध्ये चार पंचायत समित्यांचा समावेश असून, त्यापैकी दोन पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. विशेषतः दिंडोरीचे सभापतिपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे.
सभापतिपदांचे आरक्षण खालीलप्रमाणे :
अनुसूचित जाती: १ (महिलांसाठी राखीव)
अनुसूचित जमाती: ३ (१ महिला राखीव)
नागरिकांचा मागास प्रवर्ग: ४ (२ महिला राखीव)
सर्वसाधारण: २ (१ महिला राखीव)
या सोडतीमुळे पंचायत समिती सभापतिपदांचे आरक्षण निश्चित होईल, ज्यामुळे निवडणुकीच्या तयारीला गती मिळेल.





