Pune District : पंचायत समिती आरक्षणाने हवेलीत ‘टाईट’ वातावरण

पानशेत : नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) च्या आरक्षण सोडतीने हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विशेषतः खेडशिवापूर-खानापूर गटात आरक्षणाने मोठी उलथापालथ घडवली असून, या ठिकाणी आता महिलाराजचे वर्चस्व वाढले आहे.
आरक्षणाची स्थिती:
खेडशिवापूर गण (पं. स.): मागास प्रवर्ग महिला, खानापूर गण (पं. स.): सर्वसाधारण पुरुष, खेडशिवापूर -खानापूर गट (जि. प.): सर्वसाधारण महिला.
इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला
खेडशिवापूर- खानापूर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाल्यामुळे या संपूर्ण गटात महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे. दुसरीकडे, जिल्हा परिषद लढण्याची तयारी केलेल्या अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये या आरक्षणामुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे.
यामुळे आता खेडशिवापूर-खानापूर जिल्हापरिषद गटामध्ये महिला उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.
“आमच्या भाजपा आमदार भिमराव (अण्णा ) तापकीर यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागातील एकमेव जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जिल्हा परिषदेसाठी पडले आहे. तसेच पंचायत समितीसाठी देखील आरक्षण पडले आहे. भीमराव अण्णा तापकीर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सर्व टीम या निवडणुकीला सामोरे जाईल आणि विजयी होईल. पूर्णपणे जिल्हा परिषद गटात विजय होईल. आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ.
– अनिरुद्ध यादव, (मा.प. स.सदस्य भाजपा)माझ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गावामध्ये ६ कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. येणाऱ्या काळात, आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावर पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहोत.
अक्षदा बांडेहवलदार, (माजी सरपंच, श्रीरामनगर)
पक्षाने मागील काळात जी विकासकामे केलेली आहेत, त्यावर लोक नक्कीच मतदान करतील.
-नवनाथ (दादा) पारगे, (मा. जि. प. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष )
”या झेडपी गटात आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य पहिल्यापासून राहिलेले आहे. हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड आहे.” हा गट आता अजित पवार यांना मानणारा मतदारसंघ आहे.” पवार यांच्या कामामुळे प्रभावित होऊन लोक दादांच्याकडे जास्त आकर्षित आहेत.”आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ”राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आता एका जागेसाठी चार-चार, पाच-पाच जण इच्छुक आहेत.”
– राजेंद्र पवार, (खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष, अजित पवार पवार गट)





