Walhe water crisis – केंद्र शासनाने ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी या योजना पूर्णत्वास गेल्या नसल्याने, तसेच दिवसेंदिवस वाढती उष्णतेने जमिनीतील पाणीपातळीत खालावली असल्याने, वाल्हे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अपुऱ्या टँकरच्या संख्येमुळे दुष्काळाची छाया अधिक गडद होत आहे. आवश्यक असलेल्या टंचाईग्रस्त भागात सद्यःस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करण्यात आला असला तरी, पाणीटंचाई जाणवत असून, टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी टंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांमधून होत आहे. वाल्हे (ता.पुरंदर) व परिसरामधील गायकवाडवाडी, चाहूर, वागदरवाडी येथील बाळाजीचीवाडी, मोरूजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी, झापाचीवाडी, पवारवाडी यांसह राख व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमार्फत टँकरच्या फेऱ्या सुरू आहे. दरम्यान,या गावांत जलजीवन मिशनची कामे रडतखडत सुरू असून,ही कामे त्वरित पुर्ण होणे गरजेचे असल्याचे, ग्रामस्थांनी सांगितले. शासनाच्या पाणी टंचाई आराखड्यातून ही गावे वर्षानुवर्षे येत असून ही गावे पाणी टंचाई आराखड्यातून मुक्त कधी होणार ? हा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. पाण्याचा टँकर. पुरंदर तालुक्यातील वाल्हेसह, दौंडज, वागदरवाडी, राख आदी गावातील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने या गावांतील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे.शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही. मे-जूनपर्यंत पाणी टंचाईचा सामना.. टंचाईग्रस्त गावांना दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर या पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्या संभाव्य पाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे पुरंदर पंचायत समिती कार्यालयाकडून हा शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाणीटंचाई निवारणासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखली जात आहे. परिसरातील वाड्या-वस्त्या जरी शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात नोंदविल्या असल्या तरी याव्यतिरिक्त अनेक गावांना मे-जून महिन्याअखेरीस पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.