Kalas News : कळस-लोणीदेवकर रस्त्यालगत कचरा डेपो; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
Kalas News : इंदापूर तालुक्यातील कळस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कळस-लोणीदेवकर रस्त्यालगत असलेल्या कचरा डेपोचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

Kalas News : इंदापूर तालुक्यातील कळस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कळस-लोणीदेवकर रस्त्यालगत असलेल्या कचरा डेपोचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हा कचरा डेपो इतरत्र हलविण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार लेखी तसेच तोंडी स्वरूपात करण्यात आली आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Kalas News)
कळस-लोणीदेवकर रस्त्यालगतच हा कचरा डेपो असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, वाहनचालक व नागरिकांना नाक दाबून या मार्गावरून जाण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Kalas News)
या कचरा डेपोवर गावातील भटक्या कुत्र्यांचे कळप अन्नाच्या शोधात दिवसरात्र जमा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कचऱ्यावर अन्न शोधण्यासाठी येणारे कुत्रे अचानक रस्त्यावर आडवे जात असल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण होत आहे. (Kalas News)
कुत्र्यांमुळे या रस्त्यावर यापूर्वी छोटे-मोठे अपघात झाल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कचरा डेपोचा प्रश्न केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित राहिला नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न बनला आहे. (Kalas News)
कचरा डेपो इतरत्र हलविण्याबाबत वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Kalas News)





