Pakistan airspace : पाकिस्तानची हवाई हद्द भारतीय विमानांना बंदच; मुदतीत २४ जुलैपर्यंत आणखी वाढ
दोन्ही देशांमधील लष्करी तणाव निवळला असला तरी, मुत्सद्दी संबंध अजूनही तणावपूर्ण असून संकटाच्या काळात सुरू केलेले प्रतिशोधात्मक उपाय दोन्ही बाजूंनी कायम ठेवले आहेत.

Pakistan airspace – भारतात झालेला पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेले ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसोबत तणाव कायम आहे. त्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना लावलेले निर्बंध आता २४ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या विमानांना आपली हवाई हद्द बंद करण्याची घोषणा केली होती.
पाकिस्तानी हवाई क्षेत्र २४ एप्रिल २०२५ पासून भारतीय विमानांना बंद आहे. याला उत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानी विमानांच्या प्रवेशावर बंदी घातली असून ती ३० एप्रिल २०२५ पासून लागू आहे.
पाकिस्तानी विमान वाहतूक प्राधिकरणाने नोटीस टू एअरमन (नोटम)मध्ये म्हटले आहे की सर्व भारतीय नोंदणीकृत, करारावर घेतलेल्या वाणिज्यिक आणि सैन्य विमानांना १६ जून रोजी सायंकाळी ५:५० पासून २४ जुलै रोजी पहाटे ४:५९ पर्यंत बंदी लागू राहील.
दरम्यान, दोन्ही देशांमधील लष्करी तणाव निवळला असला तरी, मुत्सद्दी संबंध अजूनही तणावपूर्ण असून संकटाच्या काळात सुरू केलेले प्रतिशोधात्मक उपाय दोन्ही बाजूंनी कायम ठेवले आहेत.





