दखल : कॉम्प्युटर आणि आयटीचा फुगा फुटला!
आयटी आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (IT and Computer Sector) मोठी कर्मचारी कपात अशा बातम्या सतत येत आहेत. आयटी क्षेत्राचा झगमगाट आता फिका पडत चालला आहे. याचा एक परिणाम ‘विवाह’ या सामाजिक घटकावरही पडताना दिसून येत आहे.

– प्राचार्य डॉ. सुभाषराव देवकर
IT and Computer Sector : आयटी आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (IT and Computer Sector) मोठी कर्मचारी कपात अशा बातम्या सतत येत आहेत. आयटी क्षेत्राचा झगमगाट आता फिका पडत चालला आहे. याचा एक परिणाम ‘विवाह’ या सामाजिक घटकावरही पडताना दिसून येत आहे.
प्रत्येक गोष्टीला कधी चांगले दिवस असतात, ते दिवस उंच शिखरावर घेऊन जाणारे असतात. 2024 पर्यंत कॉम्प्युटर आणि आयटी क्षेत्राला असेच उंच भरारी घेण्याचे दिवस होते आणि ते सर्वांनी अनुभवले आहे. परंतु हे अनुभवत असताना काही कालावधी (IT and Computer Sector) पुढे गेला, वेळ पुढे गेली. वेळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे वेळेनुसार परिस्थिती बदलते.
एक लक्षात घ्या की, भारतीय लोकांची मानसिकता गर्दी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच पुन्हा गर्दी करण्याची आहे.त्याच धर्तीवर शिक्षण क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना आपले पाल्य कॉम्प्युटर किंवा आयटी इंजिनिअर झाला पाहिजे, त्याचं करिअर त्यामध्येच आहे अशी मनोकामना धरून पालक आपल्या पाल्याला या क्षेत्रामध्ये टाकतात. 2024 च्या अगोदर ज्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं त्यावेळी त्यांना कुठेतरी काहीतरी मिळालं, परंतु जागतिक मंदीच्या दृष्टिकोनातून आज परिस्थिती बदलली आहे.
कॉम्प्युटर आणि आयटी क्षेत्राला कुठेतरी चांगले गतीचे दिवस येतात मग पाठीमागे खेचणारे दिवसही येतात. ही परिस्थिती अनेक नामवंत आयटी क्षेत्रातील आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील कंपन्यांवरही येते. कर्मचार्याला कोणतीही पूर्वसूचना न देता शेकडो हजारोची बॅच कामावरून (IT and Computer Sector) कमी केली जात आहे.
याचं कारण असे की जागतिक स्तरावर या क्षेत्रामध्ये भरमसाठ वाढ झालेली असल्यामुळे बाजारात किंमत नक्कीच कमी होणार. कारण कच्चामाल खूप प्रमाणामध्ये आलेला आहे त्यामुळे पक्कामाल तयार झालेला आहे, परंतु त्याला बाजारपेठच नाहीये. हीच परिस्थिती आज या क्षेत्राची झाली आहे.
आयटी किंवा कॉम्प्युटर क्षेत्राचा विवाह या सामाजिक अंगावरही परिणाम झालेला दिसून येतो. आयटी किंवा कॉम्प्युटर क्षेत्रात असेल म्हणजे चांगले विवाह जुळवून येतात असा कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टिकोन आहे. म्हणूनही बरेच पालक आपल्या पाल्यांना या क्षेत्रात टाकतात. पण आता आयटी आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील नोकरीची शाश्वती नसल्यामुळे हे क्षेत्र पाहून होणार्या विवाह या मुद्द्यालाही फारसे चांगले दिवस राहिले नाहीत.
एक काळ असा होता की, शहरी व ग्रामीण भागातल्या मुलींना जर भविष्याचा साथीदार निवडायचा असेल तर त्यासुद्धा आयटी आणि कॉम्प्युटर क्षेत्रातल्या मुलांना प्राधान्य देत. त्यांचे पालकही त्याच दृष्टिकोनातून विचार करत. याचं कारण एक आहे, आयटी क्षेत्रामधील झगमगाट. त्या झगमगटामुळे त्या ठिकाणी प्रत्येक जण आकर्षित झाला आणि तो आकर्षित झाल्यामुळे त्या क्षेत्रामध्ये भरमसाठ वाढ झाली.
पण आज हे क्षेत्र शाश्वत राहिलेले नाही याची जाण पालकांनी, मुलींनी विवाह बंधनात अडकत असताना ठेवली पाहिजे. सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या गेल्या पाहिजेत. कारण भविष्यात अचानक नोकरी जाऊ शकते आणि मुलगी व जावई दोघांनाही सांभाळावे लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती पुढच्या काळामध्ये नक्कीच येणार आहे. त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून, कौटुंबिक दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना पालकांनी मुला मुलींना जागृत करणे गरजेचे आहे. मुला मुलींनी भविष्याचा वेध घेऊन योग्य पाऊल टाकलं पाहिजे.
दुसरी बाब लक्षात घ्या, शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत विचार करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी आणि पालक आपल्याला शिकायचंय, कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचंय, आयटी इंजिनिअर व्हायचंय हीच भूमिका घेतोय. परंतु ही भूमिका घेत असताना नक्कीच भविष्याचा विचारही करा. आज या क्षेत्राची वाटचाल तीन-चार नंबरवर आलेली आहे.
भविष्यात आणखी किती नंबर खाली जाईल हे सांगता येत नाही. अशावेळी आपण या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं का, हा पण विचार करणे गरजेचे आहे. ज्या विषयाला आज कमी महत्त्व आहे किंवा तीन-चार वर्षांपूर्वी पाठ फिरवलेला जो विषय असेल तो विषय आपण आता निवडला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा करिअरच्या क्षेत्रामध्ये कालचक्र फिरत असतं. आज हा उंच शिखरावर विषय पोहोचलाय उद्या तोच विषय पुन्हा खाली येणार आहे. त्यामुळे आपल्या भविष्याचा विचार करून करिअरसाठी विचारपूर्वक निवड केली पाहिजे.
अनेक क्षेत्रांमध्ये आपण वाटचाल करू शकतो, एकच क्षेत्र असं नसतं की त्यामध्ये पाऊल टाकलं तरच आपलं भविष्य घडतं. मनामध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे की, माझं कोणतंही क्षेत्र असो ज्या क्षेत्रात मी पाऊल टाकेल त्या क्षेत्रामध्ये मी उच्च पदावर काम करण्याची संधी प्राप्त करेल. त्यावेळेसच भविष्य तुमच्या हातामध्ये घडवण्याची ताकद निर्माण करेल.
आज कॉम्प्युटर आणि आयटीची परिस्थिती फार नाजूक आहे. त्यामुळे विवाह संबंध जोडताना एक लक्षात घ्या की, पूर्वीचा या क्षेत्रातला झगमग पाहू नका वास्तव परिस्थिती काय आहे ती पाहा. या क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांनी खूप कर्मचारी कमी केलेले आहेत. ज्या ठिकाणाहून कॉम्प्युटर आयटी क्षेत्राची उन्नती झाली त्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील कर्मचार्यांचीही कपात केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
त्यामुळे सर्वच देशांमध्ये आयटी आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील (IT and Computer Sector) आलेली ही जागतिक मंदी लक्षात घेता उघड्या डोळ्यांनी करिअर आणि विवाह या दोन्ही प्रश्नांच्या बाबतीत वस्तुस्थितीचा विचार सर्वांनी केला पाहिजे.






