Pakistan : पाकिस्तान भारतासाठी बंद ठेवणार हवाई हद्द !

इस्लामाबाद – भारताच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द बंदच ठेवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. आणखी एक महिनाभर पाकिस्तानची हवाई हद्द भारताच्या विमानांसाठी बंद असणार आहे.
पहलगाम येथे गेल्या महिन्याच्या २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव निर्माण झाला होता.
भारताने ७ मे रोजी केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. ही बंदी महिन्याभरासाठी लागू होती.
या बंदीची मुदत २३ मे रोजी संपणे अपेक्षित होते. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेच्या नियमानुसार हवाई हद्दीवरील नियंत्रण एकावेळी एक महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये.
पाकिस्तानने घातलेली हवाई हद्द वापरावरील बंदी शुक्रवारी संपण्याच्या आगोदरच पाकिस्तानने त्याला आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती पाकिस्तानातील माध्यमांनी दिली आहे.
हवाई हद्दीवरील बंदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारी पातळीवरून घेण्यात आला असून आज (बुधवारी) किंवा गुरुवारी त्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे, असे एका वाहिनीने म्हटले आहे.
पाकिस्तानने असे निर्बंध लादण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९९९ चा कारगिल संघर्ष आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देखील पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.





