PAK vs BAN 2nd Test Day 3 Stumps : पाकिस्तानवर क्लीन स्वीपचा धोका, दुसऱ्या डावात 9 धावांत गमावले 2 गडी…

Pakistan vs Bangladesh 2nd Test Day 3 Stumps : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रावळपिंडीच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर यजमान पाकिस्तानने दुसऱ्या डावात अवघ्या 9 धावांवर 2 गडी गमावले होते. त्यामुळे आता त्यांना मालिकेत क्लीन स्वीपचाही धोका आहे. तत्पूर्वी, पाकिस्तान संघाने बांगलादेशचा पहिला डाव 262 धावांवर रोखल्यामुळे त्यांना पहिल्या डावाच्या आधारे केवळ 12 धावांची आघाडी घेता आली.
एकवेळ असे वाटत होते की पाकिस्तान संघ मोठी आघाडी मिळवण्यात यशस्वी होईल कारण बांगलादेश संघाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 26 धावा होईपर्यंत 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर लिटन दासचे शतक आणि मेहदी हसन मिराझच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी या सामन्यात शानदार पुनरागमन करत पाकिस्तानच्या आशेवर पाणी फेरले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 274 धावांवर आटोपला. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेश संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा होती, पण जेव्हा धावसंख्या 26 धावांवर पोहोचली तेव्हा शाकिब आणि मुशफिकुर रहीमसह 6 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
इथून बांगलादेश संघासाठी सामन्यात पुनरागमन करणे अजिबात सोपे नव्हते. येथून लिटन दास आणि मेहदी हसन मिराझ यांनी मिळून प्रथम धावसंख्या 100 धावांपर्यंत नेली आणि नंतर पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांचे खच्चीकरण करत वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये 7व्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी झाली आणि पुन्हा एकदा सामना बरोबरीत आणला.
मेहदी हसन मिराझने 124 चेंडूत 78 धावांची खेळी केली आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा बांगलादेश संघाची धावसंख्या 191 अशी होती. त्याचवेळी बांगलादेश संघाने 193 धावांवर आपली 8वी विकेटही गमावली. येथून लिटन दासने पुन्हा एका टोकाकडून डाव सांभाळला आणि धावसंख्या 250 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
At the end of day three, Pakistan lead by 21 runs for the loss of two wickets 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/yWdqc6E6hO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2024
लिटन दासने 228 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 138 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या जोरावर बांगलादेश संघाला पहिल्या डावात 262 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानी संघासाठी खुर्रम शहजादने बॉलसह आश्चर्यकारक कामगिरी केली आणि या डावात 6 विकेट घेतल्या. याशिवाय मीर हमजा आणि आगा सलमाननेही प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
Paris Paralympics 2024 (Shot Put) : वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करूनही रवी रोंगालीचे हुकलं पदक…
अब्दुल्ला शफिक आणि खुर्रम शहजाद पॅव्हेलियनमध्ये….
तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तान संघाला त्यांच्या दुसऱ्या डावात 4 षटके फलंदाजी करण्याची संधी मिळाली ज्यात त्यांनी केवळ 3.4 षटके फलंदाजी केली आणि 2 विकेट गमावल्या. पहिल्या डावातही विशेष काही करू न शकलेल्या अब्दुल्ला शफिकला दुसऱ्या डावातही अवघ्या 3 धावांवर हसन महमूदने आपला बळी बनवले. यानंतर नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आलेला खुर्रम शहजाद 6 चेंडूंचा सामना केल्यानंतर खाते न उघडता हसन महमूदचा बळी ठरला.





