PAK vs BAN 2nd Test Day 1 : पाकिस्तान-बांगलादेशच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचाच खेळ….

Bangladesh tour of Pakistan 2024-25 (2nd Test, Day 1) : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (30 ऑगस्ट) रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. मात्र मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेकही होऊ शकली नाही.
रावळपिंडी स्टेडियमवर खेळली जाणारी कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होणार होती, मात्र पावसामुळे नाणेफेक 12.45 वाजेपर्यंत होऊ शकली नाही. यानंतर दुपारी पंचांनी मैदान आणि खेळपट्टीचीही चाचपणी केली, मात्र पाऊस न थांबल्याने पंचांनी अखेर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
जुन्या वेळापत्रकानुसार दुसरा कसोटी सामना कराचीतील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण स्टेडियममध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे दुसरी कसोटीही रावळपिंडीला हलवण्यात आली होती.
खेळाडू हॉटेलच्या बाहेरही आले नाहीत…
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खेळण्याची शक्यता इतकी कमी होती की पाकिस्तान आणि बांगलादेशचे खेळाडू हॉटेल सोडून मैदानातही आले नाहीत. पंख्याच्या साह्याने खेळपट्टी कोरडी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण प्रयत्नांना यश आले नाही. रावळपिंडीमध्ये 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. शनिवारी म्हणजेच 31 ऑगस्टला देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळही रद्द होऊ शकतो. दरम्यान, याआधी गुरुवारीही मैदान ओले असल्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना सरावही करता आला नव्हता.
Persistent rain forces day one of the second Test to be called off 🌧️
See you tomorrow 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/N8TyPy7a7C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 30, 2024
बांगलादेश 1-0 ने पुढे …
पहिली कसोटीही रावळपिंडीत खेळली गेली आणि त्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला, पण दिवसाचा उर्वरित खेळ सुरळीत पार पडला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली होती त्याबरोबरच बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला अवघ्या 146 धावांत गुंडाळले आणि 30 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून पूर्ण करत ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. या सामन्यात शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज या फिरकीपटूंनी बांगलादेशच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली तर पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज खेळवला नाही, ज्यामुळे त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले.
PAK vs BAN 1st Test : बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकला 10 विकेट्सने पराभूत करत रचला इतिहास…
WTC : दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना…
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर यजमान संघाचेही स्लो ओव्हर रेटमुळे 6 गुण वजा करण्यात आले. त्यामुळे संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. आता जर पाकिस्तानला डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवायचे असेल तर त्याला उर्वरित आठ सामने जिंकावे लागतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनुसार बांगलादेशसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. स्लो ओव्हर रेटमुळे बांगलादेशचे 3 गुणही कमी झाले. त्यामुळे बांगलादेशचा संघ आता 21 गुणांसह 7व्या स्थानावर तर पाकिस्तानचा संघ 16 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.





