Pakistan Train Hijack: नरसंहार घडवणार! बलुच लिबरेशन फोर्सने पाकिस्तानचे कंबरडे मोडले, 11 जवान ठार

Pakistan Train Hijack: पाकिस्तानमधील ट्रेन हायजॅकशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. बलूच लिबरेशन फोर्स (बीएलए) च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैनिकांनी जाफर एक्स्प्रेस ताब्यात घेतल्यानंतर सुरू असलेल्या कारवाईत 182 लोकांना ओलीस ठेवले आहे. या कारवाईत आतापर्यंत 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आहेत, तर एक ड्रोनही पाडण्यात आला असून जाफर एक्स्प्रेसवर बीएलएचे पूर्ण नियंत्रण आहे.
BLA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बलुच लिबरेशन आर्मीने मशकाफ, धादर, बोलान येथे एक नियोजित ऑपरेशन राबवले आहे, जिथे आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे, त्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली. सैनिकांनी तातडीने ट्रेन ताब्यात घेतली आणि सर्व प्रवाशांना ओलीस ठेवले.
बीएलएने इशारा दिला आहे की, पाकिस्तानी लष्कराने कोणतीही लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सर्व शेकडो ओलिस मारले जातील आणि रक्तपाताची जबाबदारी पूर्णपणे पाक सैन्यावर राहील.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “डोंगरांनी वेढलेल्या बोगद्यासमोर ट्रेन अडकली आहे. ज्या ठिकाणी ट्रेन थांबली तो भाग हा डोंगराळ भाग आहे, ज्यामुळे दहशतवाद्यांना लपून हल्ला करणे सोपे जात आहे”.
सरकारी निवेदनानुसार सिबी रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे, तर रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचत आहेत. मात्र, खडकाळ प्रदेशामुळे घटनास्थळी पोहोचण्यात अधिकाऱ्यांना अडचणी येत असल्याचे पाकिस्तान प्रशासनाचे म्हणणे आहे. रेल्वे विभागाने बचाव कार्यासाठी आणखी गाड्या घटनास्थळी पाठवल्या आहेत, असे निवेदनात पुढे म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी पाकिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने एका प्रवासी ट्रेन हायजॅक केली. ही ट्रेन क्वेट्टाहून पेशावरला जात होती.





