Pakistan Train Hijack : ट्रेनमधील 214 ओलिसांना ठार केले, BLA चा नवा दावा; पाकला ठरवले दोषी

Pakistan Train Hijack | पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली होती. या ट्रेनमध्ये 400 पेक्षा अधिक नागरिक प्रवास करत होते. हे अपहरणनाट्य समाप्त झाल्याची माहिती पाकच्या लष्कराकडून देण्यात आली होती. मात्र, आता बीएलएने वेगळा दावा केला आहे.
पाकिस्तानमधील फुटीरतावादी संघटना बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दावा केला आहे, सर्व 214 ओलिसांना ठार करण्यात आले आहे. मारले गेलेले सर्व ओलीस हे पाकिस्तानी लष्कराचे सैनिक होते. त्याआधी बलुच बंडखोरांवर पाकच्या सुरक्षा दलांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये 30 दहशतवादी ठार झाले. तर ओलीस ठेवलेले रेल्वेतील 190 प्रवाशांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
बीएलएच्या प्रवक्त्याने या मृत्यूंसाठी पाकिस्तान सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान सरकार त्यांच्याशी बोलण्यास तयार नाही. या मृत्यूंनंतरही पाकिस्तान सरकार कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बलुच बंडखोरांनी बोलन खिंडीजवळ क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले होते. या ट्रेनमध्ये 400 पेक्षा अधिक लोक होते.
पाकिस्तान सरकारने दावा केला की, हे संकट संपले असून, सर्व बंडखोर सैनिक मारले गेले आहेत. सर्व ओलिसांची सुटका करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, दुसरीकडे बीएलएने पाकिस्तान सरकारचा दावा फेटाळला आहे. बीएलएने पाक सरकारकडे कैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी 48 तासांचा कालावधी असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तान सरकारकडून जवानांचा वापर शांततेसाठी नाही तर युद्ध भडकवण्यासाठी केला जातो. याचाच परिणाम म्हणून आता 214 जवानांना प्राण गमवावे लागले आहेत, असेही बीएलएने म्हटले आहे. यासोबतच, त्यांनी मारले गेलेल्या बंडखोरांना शहीद म्हटले आहे.





