Pakistan Train Hijack : अखेर पाकमधील रेल्वे अपहरणनाट्य समाप्त; ३० दहशतवादी ठार, १९० प्रवाशांची सुटका

Pakistan Train Hijack – बलुचिस्तान प्रांतात प्रवासी रेल्वेचे अपहरण करणाऱ्या बलुच बंडखोरांवर सुरक्षा दलांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आज ३० दहशतवादी ठार झाले. तर ओलीस ठेवलेले रेल्वेतील १९० प्रवाशांची सुटका करण्यात आली. रेल्वे अपहणाचे वृत्त समजताच पाक लष्कर आणि फ्रन्टिअर कॉर्प्सने मिळून संयुक्तपणे कारवाई सुरू केली होती.
क्वेट्टापासून १६० किलोमीटर अंतरावर गुद्दालर आणि पिरू कुनरी दरम्यानच्या बोगद्याजवळ बलुच बंडखोर आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमधील धुमश्चक्री बुधवारी दुपारपर्यंत सुरू होती. अपहरण करण्यात आलेल्या जाफर एक्सप्रेस रेल्वेवर सुरक्षा दलांनी ताबा मिळवला आहे.
या कारवाईदरम्यान मुख्य इंजिनमधील दोन चालक आणि आठ सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. जखमी झालेल्या सुमारे ३० प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी महिला आणि बालकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त होते.
मात्र काही ओलिसांची कालच सुटका करण्यात आल्याचा दावा बलुच बंडखोरांच्यावतीने केला गेला होता. या अपहरणामध्ये नेमक्या किती दहशतवाद्यांचा सहभाग होता, हे समजू शकलेले नाही.





