Pakistan : पाकिस्तान हादरला.! बलुचिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 10 ठार, 35 जखमी

Pakistan | Quetta Blast – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात निमलष्करी दलाच्या मुख्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान १० जण ठार आणि ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. क्वेट्टा शहरातील फ्रॉन्टियर कॉन्सटॅब्युलरीजच्या मुख्यालयाजवळ हा बॉम्बस्फोट झाला, असे बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी सांगितले.
जखमी झालेल्या ३२ जणांना जवळच्या वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. क्वेट्टा सिव्हील हॉस्पिटल, बलुचिस्तान मेडिकल कॉलेज हॉस्पिटल क्वेट्टा आणि ट्रॉमा सेंटर या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
या बॉम्बस्फोटाची दृश्ये टिव्हीवर आणि सोशल मीडियावरच्या व्हिडीओद्वारे व्हायरल झाली आहेत. भर रस्त्यात ताकदवान स्फोट झाला या स्फोटात रस्त्यावरून जाणारे काही पादचारी देखील मारले गेले. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
#QuettaBlast CCTV footage
Highly condemnable pic.twitter.com/BDaaA4VBn8— Haroon Baloch, PhD (@advertbalcha) September 30, 2025
बलुच बंडखोरांकडून नेहमी अशा प्रकारे सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी स्फोट घडवून आणले जातात. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुग्ती यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हा एक दहशथवादी हल्ला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळापासून हिंसाचारी कारवाया होत आहेत. तेल आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या बलुचिस्तानमध्ये पाक सरकार आणि चीनच्या सहकार्याने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत ६० अब्ज डॉलरच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
बॉम्बस्फोटाचे नेमके कारण काय?
दरम्यान, हा बॉम्बस्फोट नेमका कोणी घडवून आणला, यामागे नेमका कोणाचा हात आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर आता बलुचिस्तान परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.





