पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित

संयुक्त राष्ट्र – पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मुद्यावरील शांततापूर्ण तोडग्यासाठी जम्मू काश्मीरला विशेष दर्दा देणारे ३७० कलम भारताने पुन्हा लागू करायला हवे आणि चर्चेला सुरुवात करायला हवी, असे शरीफ म्हणाले.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७९ व्या सत्रामध्ये शरीफ हे कास्मिरचा मुद्दा उपस्थित करतील, अशी शक्यता वर्तवली जातच होती. त्यानुसार ३७० कलमाच्या अनुषंगाने त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्या २० मिनिटांच्या भाषणामध्ये शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पॅलेस्टिनी नागरिकांप्रमाणेच जम्मू काश्मीरच्या नागरिकांनीही स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कासाठी शतकभरापासून संघर्ष केला आहे.
एकतर्फीपणे आणि बेकायेदेशीरपणे २०१९ साली रद्द केलेले राज्यघटनेतील ३७० वे कलम स्थायी शांततेसाठी आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षाविषयक ठरावाच्या अनुषंगाने भारताने जम्मू काश्मीरच्या लोकांच्या मताचा आदर करून पुन्हा लागू केले पाहिजे, असे शरीफ म्हणाले.
पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्राच्या मंचावर सातत्याने जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जात असतो. चर्चेचा मुद्दा कोणताही असला तरी हा मुद्दा पाकिस्तानकडून उपस्थित केला जातो. मात्र दरवेळी पाकिस्तानच्या या प्रयत्नांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न भाग होते, आहेत आणि नेहमीच राहतील यावर भारताने वारंवार जोर दिला आहे.
काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यापेक्षा आणि भारतावर फालतू आरोप करण्यापेक्षा आपल्या अंतर्गत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी संविधानातील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.





