Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद येथे शुक्रवारी सकाळी एका रासायनिक कारखान्यातील बॉयलरचा जोरदार स्फोट होऊन कमीत कमी 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना लाहोरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलिकपूर परिसरात घडली. फैसलाबादचे उपायुक्त राजा जहांगीर अनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रासायनिक कारखान्यातील बॉयलरमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे कारखान्याची इमारत तसेच आसपासच्या काही संरचनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनवर म्हणाले, “आतापर्यंत मलब्यातून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सात जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.” अधिकाऱ्यांनी शक्यता व्यक्त केली की अद्यापही काही लोक मलब्याखाली अडकलेले असू शकतात. बचाव पथके युद्धपातळीवर मलबा हटवण्याचे काम करत असून जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा बचाव आणि मदत कार्यात गुंतवली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक डॉ. उस्मान अनवर यांनी ‘रेस्क्यू 1122’, अग्निशमन दल आणि इतर संबंधित यंत्रणांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्या मरियम नवाज यांनी घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त करत पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच फैसलाबादच्या आयुक्तांकडून या दुर्घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.