जगप्रसिद्ध मराठी चित्रकार गोपाळ दामोदर देऊस्कर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 रोजी अहमदनगर येथे झाला. गोपाळराव हे दोन वर्षांचे असताना फ्लूच्या साथीत आई आणि वडील दोघांचा मृत्यू झाला. त्यांचा व त्यांची मोठी बहीण शांता यांचा नातेवाईकांनी सांभाळ केला. नंतर ते हैदराबाद येथे रामकृष्ण देऊसकर या काकांकडे सहा वर्षे राहिले.
मूळचे देवास, मध्य प्रदेश येथील देऊसकर कुटुंब अहमदनगर येथे आले होते. देऊसकर यांच्या घरात तीन पिढ्यांपासून कलेची पार्श्वभूमी होती. त्यांचे आजोबा वामन देऊसकर आणि त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. गोपाळ यांचे वडील मिशन हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक होते. मोठे काका रामकृष्ण देऊसकर हे विसाव्या शतकातील गाजलेले चित्रकार होते.
त्यांनी वर्ष 1927-36 दरम्यान मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. 1927 साली त्यांनी मुंबईला आल्यावर खेतवाडी येथे ललित कलादर्शन या नाटकमंडळीच्या बिऱ्हाडात राहिले. त्यांनी 1931 मध्ये जे. जे. मधील अभ्यासक्रम पूर्ण करून प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक पटकावले. जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी लंडन येथे प्रदर्शन भरवले होते.
तेथे देऊसकरांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले. त्यांची कला पाहून निजामाने पाच वर्षांकरिता खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले व लंडनमधील रॉयल अकादमीत त्यांनी शिक्षण घेतले. त्या संस्थेच्या लंडनमधील जागतिक कला प्रदर्शनात त्यांनी सातत्याने पाच वर्षे कलाकृती प्रदर्शित करण्याचा बहुमान मिळविला होता. वर्ष 1936 व 1938 च्या रॉयल अकादमीच्या प्रदर्शनात देऊसकरांची “शकुंतला’ व “अ बुल्स हॉलिडे’ अशी शीर्षके असलेली चित्रे प्रदर्शित करण्यात आली.
ही चित्रे बडोदा येथील संग्रहालयात आहेत. त्यांनी शकुंतलेचे “पत्रलेखन’ या चित्रांमध्ये निसर्गघटकांच्या पार्श्वभूमीचा उत्कृष्ट वापर केला आहे. बडोदा नरेश प्रतापसिंह गायकवाड यांची “घोड्यावरून सलामी’ आणि “राजगृहात संस्थानिक’ या दोन्ही चित्रांमधून त्यांच्या कल्पकतेचा प्रत्यय येतो. त्या वेळी ही चित्रे मराठी नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर छापली गेली. हैदराबाद येथील सालारजंग वस्तुसंग्रहालय उभारणीत नबाबासोबत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
सालारजंग म्युझियमची मांडणी ही मराठी माणसाच्या कल्पतेचे द्योतक आहे. भारतात परतल्यावर त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. “व्यक्तिचित्रकार’ म्हणून देऊसकरांनी स्वतःची व्यावसायिक कारकीर्द घडविली. त्यांच्या चित्रशैलीला बॉम्बे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले होते.
आजही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर तसेच टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांनी “चित्रकार गोपाळ देऊसकर’ या पुस्तकातून देऊसकरांमधला कलावंत आणि माणूस याची सुंदर ओळख दिली आहे. सिमला येथील प्रदर्शनात व्हाइसरॉयचे पदक, भारतीय रेल्वेचे प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले. 8 फेब्रुवारी 1994 रोजी त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस