पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर; लोकसभेत होणार १६ तास चर्चा

नवी दिल्ली – पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर संसदेत चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ती मान्य करत केंद्र सरकारने लोकसभेत १६ तासांच्या चर्चेची तयारी दर्शवली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये विविध पक्षांचे खासदार सहभागी झाले.
चालू आठवड्यातील सरकारच्या कामकाजाच्या अजेंड्यात संबंधित मुद्द्यांवरील चर्चेचा समावेश नसल्याबद्दल बैठकीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर सरकारच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडली. चालू आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत.
त्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यातच चर्चा शक्य आहे, असे त्या प्रतिनिधींनी नमूद केले. त्यामुळे स्वत: मोदी संबंधित मुद्द्यांवर उत्तर देणार आहेत का, अशी विचारणा विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, तसा निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगण्यात आले.
चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही उपस्थित असावे, असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. सरकारने चर्चेची तयारी दर्शवली असली तरी ती पुढील आठवड्यातच होण्याची चिन्हे आहेत.





