श्रीनगर – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी समाजात विभाजन घडवण्याच्या हेतूने पहलगाम दहशतवादी हल्ला घडवण्यात आल्याचे भाष्य केले. राहुल यांनी श्रीनगरमधील लष्करी रूग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले, एका जखमीची मी भेट घेतली. इतर जखमी परतले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. कुटूंबांमधील सदस्य गमावलेल्यांविषयी मी सहवेदना, आपुलकी व्यक्त करतो. एका भावाने दुसऱ्या भावाविरोधात लढावे या उद्देशातून हल्ला घडवण्यात आला. अशावेळी देशाने एकजूट राहण्याची गरज आहे. दहशतवाद्यांचे मनसुबे अयशस्वी ठरवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकमेकांसमवेत उभे राहायला हवे. हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्व जनतेने त्या कृत्याचा निषेध केला आहे. ती जनता ठामपणे देशासमवेत उभी आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचीही राहुल यांनी भेट घेतली. कॉंग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठिशी उभा असल्याची ग्वाही त्या भेटींमध्ये राहुल यांनी दिली. त्यांनी व्यापारी, विद्यार्थी नेते आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांच्या शिष्टमंडळांशीही संवाद साधला.