डिमॅट खात्यांमध्ये झपाट्याने वाढ; शेअर बाजारात गुंतवणुकीकडे ग्रामीण भागांचा कल

मुंबई – किरकोळ गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात व्यवहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे डिमॅट खात्यांची संख्याही वाढत आहे. 2025 मध्ये सक्रिय डिमॅट खात्यांची संख्या 19.4 कोटी होती. 2019 मध्ये ही संख्या केवळ 3.6 कोटी होती, अशी माहिती बाजार नियंत्रक सेबीने जारी केली आहे.
या संदर्भात बोलताना सेबीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, कुठल्याही गुंतवणुकी संदर्भात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. भारतीय शेअर बाजार आणि शेअर बाजार नियंत्रकांनी गुंतवणूकदारांचा विश्वास कमविला असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करणे, गुंतवणुकीचे व्यवहार सुलभ करणे या बाबीवर तंत्रज्ञानाची मदत घेऊन भर देण्यात येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांचे प्रमाण वाढत आहे.
अगोदर शेअर बाजारात फक्त शहरातील लोक गुंतवणूक करत होते. मात्र इंटरनेटमुळे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे आता खेड्यापाड्यातील लोक शेअर बाजारात गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 30 वर्षात भारतीय शेअर बाजारातचे आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे शेअर बाजारात देशातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदाराची गुंतवणूक वाढत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार जगातील पहिल्या 10 शेअर बाजारामध्ये याच कारणामुळे असल्याचे त्यांनी सांगितले.
शेअर बाजाराच्या व्यासपीठावरून नव्या तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांनीही यशस्वीरित्या भांडवल उभारणी केली आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात आता भांडवल उभारणी मोठ्या प्रमाणात होत आहे. 2030 पर्यंत या क्षेत्राला 250 अब्ज डॉलरच्या भांडवलाची गरज आहे. ही गरज शेेअर बाजाराच्या माध्यमातून काही प्रमाणात पूर्ण होऊ शकेल असे सांगण्यात आले.
परदेशी गुंतवणूक मंदावली –
अगोदर भारतीय शेअर बाजारांमध्ये 20% परदेशी संस्थागत गुंतवणूक होती. ती कमी होऊन 13 टक्के झाली आहे. मात्र ही तूट देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी भरून काढली आहे. अगोदर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांची गुंतवणूक 17 टक्के होती. ती आता 22 टक्क्यावर आली आहे. दहा वर्षांमध्ये भारतीय कंपन्यांनी शेअर बाजाराच्या माध्यमातून 93 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली आहे. काही दिवसापासून आयपीओचेे प्रमाण त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाढत आहे.




