पुणे जिल्हा : ग्रामीण भागात अजूनही नंदीबैलाची प्रथा टिकून

लाखणगाव – आंबेगाव तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. या ऐन गुलाबी थंडीतही सकाळच्या प्रहरात विविध गावांमध्ये नंदीबैलवाले,पिंगळा अशा जुन्या प्रथा जपणारे आजही फिरताना दिसत आहे. ग्रामीण भागात नंदीबैलाची प्रथा आजतागायत टिकून असल्याचे दिसून येत आहे.
कळंब,चांडोली, लौकी, एकलहरे, नांदूर,विठ्ठलवाडी, टाकेवाडी,साकोरे,महाळुंगे, चास आदी गावांमध्ये सकाळच्या वेळी नंदीबैलवाले पारंपारिक प्रथेनुसार भविष्य सांगून परिसरातील नागरिकांची कौतुकाची थाप मिळवून धान्य, बिदागी, बक्षीस स्वरूपात रोख रक्कम,जुने कपडे स्वीकारताना दिसत आहेत. ग्रामीण भागात नंदीबैलाची प्रथा आजयागता टिकून असल्याचे दिसून येत आहे.
शहरी भागात बऱ्याचशा परंपरा मोडीत निघाल्या असून ग्रामीण भागात आजही बहुतांशी परंपरा टिकून असल्याचे दिसून येत आहे. नंदीबैल वाले घरी आल्यानंतर घरी आवर्जून उपस्थित असलेली लहान मुले नंदीबैलावर बसवून त्यांची थोडी करमणूक नंदीबैलवाले करत असताना दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना नंदीबैलवाल्यांसोबत फोटो काढण्याचा मोह सुद्धा यावेळी प्रकर्षाने पडलेला दिसून येत आहे. पौष, मार्गशीर्ष महिन्याच्या थंडीत नंदीबैलवाले दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे गावोगाव जाऊन आपला उदरनिर्वाह करताना दिसून येतात.





