Pabe Ghat Accident: पर्यटकांवर काळाचा घाला! पाबे घाटात खोल दरीत ट्रॅव्हल्स कोसळली; दोघांचा जागीच मृत्यू
Pabe Ghat Accident: मुंबईतील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सहल ठरली शेवटची; चालकाचे नियंत्रण सुटल्याने ५० फूट खोल दरीत कोसळली बस!

Pabe Ghat Accident – राजगड किल्ल्याच्या निसर्गरम्य परिसराची सफर करण्यासाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांच्या ट्रॅव्हल्सवर पाबे घाटात काळाने घाला घातला. भीषण अपघातात दोन तरुण पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स ५० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
विश्वास बाबूराव सातिम (वय २५, रा. विलेपार्ले, मुंबई), ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय २३, रा. कांदिवली, मुंबई), अशी मृत्यू पावलेल्या पर्यटकांची नावे आहेत. ट्रॅव्हल्स चालक संदीप तुकाराम गायकवाड (वय ४७, रा. अंधेरी, मुंबई) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची चर्चा होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खासगी कंपनीतील २२ कर्मचारी सहलीसाठी ट्रॅव्हल्सने राजगड किल्ल्याकडे निघाले होते.
पाबे गावाजवळील घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रॅव्हल्सने रस्त्याचा संरक्षण कठडा तोडून ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच वेल्हे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहन दरीत एका झाडाला अडकले होते, तर चालक संदीप तुकाराम गायकवाड हा वाहनाखाली अडकला होता. इंधन गळतीमुळे आग लागण्याचा मोठा धोका होता.
मात्र, प्रतिकूल परिस्थितीत बचाव पथकाने जेसीबीच्या सहाय्याने वाहनाला आधार देऊन जखमींना बाहेर काढले. मोहिमेत वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी निलेश राणे, आकाश पाटील, पंकज मोघे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, कृष्णा मरगळे यांनी शर्थीच्या प्रयत्नांनंतर जखमींना सुरक्षित बाहेर काढले. याप्रकरणी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये गिरीश जंगम यांनी फिर्यादी दिली आहे.




