Murder Accused Arrested : चित्रपटापेक्षाही भयानक! वेश पालटून राहत होता खुनाचा आरोपी; २४ वर्षांनंतर असा सापडला जाळ्यात
Murder Accused Arrested : नोव्हेंबर २००२ मधील आंबेगाव खुर्द येथील खुनाच्या गुन्ह्यातील हिरामण पवार अटकेत; तंबाखूच्या वादातून काठीने मारहाण करत केला होता खून.

Murder Accused Arrested – तंबाखू मागण्याच्या किरकोळ वादातून खून करून गेल्या २४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला वेल्हे पोलिसांनी डोंगरदऱ्यात पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. वेश बदलून आणि नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या या सराईत गुन्हेगार पोलिसांनी लाकूडतोड व्यापारी बनून जाळ्यात अडकवले. नोव्हेंबर २००२ मध्ये, आंबेगाव खुर्द (ता. राजगड) येथील बाबुराव रामभाऊ मरगळे यांचा तंबाखू मागण्यावरून आरोपीसोबत वाद झाला होता.
या रागातून आरोपीने बाबुराव यांना काठीने बेदम मारहाण केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांना हा आरोपी महाड (जि. रायगड) परिसरातील वारंगी,
निजामपूर छत्री आणि वाळण येथील डोंगरदऱ्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. आरोपी ओळख पटू नये म्हणून मोबाईलचा वापर टाळत होता आणि नाव बदलून राहत असे. पोलिसांनी लाकूडतोड व्यापाऱ्याचा वेश परिधान करून त्याचा विश्वास संपादन केला. पोलिसांचा संशय येताच त्याने डोंगरात पळ काढला, मात्र पथकाने पाठलाग करून त्याला शिताफीने जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार (वय ४३ वर्षे, रा. कलकतवाडी, ता. महाड) असे आहे.
चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, प्रदीप कुदळे, सोमेश राऊत आणि त्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत.




