Lohagad Fort: युनेस्कोचा दर्जा मिळूनही लोहगड रामभरोसे! जागतिक वारसा स्थळावर पर्यटकांचा जीव टांगणीला…पाहा धक्कादायक वास्तव
Lohagad Fort: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होऊनही लोहगडवर मूलभूत सुविधांचा बोजवारा; पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी.

Lohagad Fort – सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला लोहगड किल्ला गेल्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाला. या ऐतिहासिक निर्णयामुळे किल्ल्याची ओळख जागतिक पातळीवर पोहोचली आणि देश-विदेशातील पर्यटकांचा ओघही वाढला. मात्र, जागतिक दर्जाचा हा मान मिळून एक वर्ष पूर्ण होत असतानाही किल्ल्यावर पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लोहगड हा मावळ तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. वर्षभर हजारो पर्यटक, ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमी याठिकाणी भेट देत असतात. विशेषतः पावसाळ्यात तर किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. हिरवाईने नटलेले डोंगर, ढगांचे मनोहारी दृश्य आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून पर्यटक येथे येतात. मात्र वाढत्या गर्दीच्या तुलनेत सुविधा वाढविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
गडावर चढाई करणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याचे दिसून येते. उन्हाळा आणि पावसाळ्यातही अनेक पर्यटकांना स्वतःच्या खर्चाने पाण्याच्या बाटल्या घेऊन जावे लागते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला पर्यटकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. किल्ल्यावरील चढाई करताना थकवा, दमछाक आणि निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) धोका वाढत असताना पाण्याची सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.
सोबतच स्वच्छतागृहांचा अभाव. किल्ल्यावर येणाऱ्या हजारो पर्यटकांमध्ये महिला आणि कुटुंबीयांची संख्या मोठी असते. मात्र, स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पर्यटन स्थळाच्या दर्जाला साजेशा सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक पर्यटक नाराजी व्यक्त करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विकास मंचाचे संदीप गाडे, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर, अमोल गोरे, गणेश उंडे आणि बसाप्पा भंडारी यांनी पुरातत्व विभागाने तातडीने या प्रश्नांची दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष
किल्ल्यावरील सुरक्षेचा मुद्दाही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गडावरील काही ठिकाणी तटबंदी आणि कडे अतिशय धोकादायक स्थितीत असून पर्यटक सेल्फी किंवा छायाचित्रे काढताना जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी रेलिंग किंवा इशारा फलकांची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वीच किल्ल्याच्या तटबंदीवरून पाय घसरून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे किल्ल्यावरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आरोग्य सुविधांचाही अभाव
आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांना मदत करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे. एखादा अपघात झाल्यास किंवा पर्यटक अचानक आजारी पडल्यास त्याला तातडीने मदत मिळावी यासाठी प्रथमोपचार पेटी, प्रशिक्षित कर्मचारी किंवा स्ट्रेचर यांसारख्या सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात अशा कोणत्याही सुविधा गडावर उपलब्ध नसल्याचे विकास मंचाने निदर्शनास आणून दिले आहे.






