Pabal Theft : पाबळमध्ये भरदिवसा थरार! उभी असलेली कार फोडली; सीसीटीव्हीत कैद झाला ‘हा’ धक्कादायक प्रकार
Pabal Theft : दोन दुचाकीस्वारांनी भरदिवसा धाडसाने केली चोरी; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिक्रापूर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू.

Pabal Theft – पाबळ (ता. शिरूर) येथे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या व्यावसायिकाच्या कारची काच फोडून कारमधील पैशांची व कागदपत्रांची बॅग लांबवल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघा युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पाबळ येथील हॉटेल शिवराज या ठिकाणी वैभव आडवळे हे त्यांच्या मित्रांसह आलेले असताना त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या कामासाठी आणलेले एक लाख रुपये व कागदपत्रे बॅग मध्ये ठेवून बॅग त्यांच्या कारमध्ये ठेवून का पार्किंग मध्ये लावून वैभव मित्रांसह जेवण करीत होते. काही वेळाने वैभव हे जेवण करुन बाहेर आल्यानंतर त्यांना कारची एक काच फुटल्याचे दिसून आल्याने त्यांनी कारमध्ये पाहणी केली.
कारमधील पैसे व कागदपत्रे ठेवलेली बॅग चोरीला गेल्याचे दिसून आल्याने त्यांनी हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले. वैभव यांच्या मागे आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी कारची काच फोडून पैशांची बॅग लांबवल्याचे निदर्शनास आले. याबाबत वैभव विकास आडवळे (रा. जवळके बुद्रुक, ता. खेड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर हे करीत आहेत.





