खडतर परिस्थितीवर मात करत दहावीच्या निकालात कचरावेचकांच्या मुलांची ‘चमकदार’ कामगिरी!

Pune News : काल दि. १३ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल अॅानलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीची बाजी मारली आहे. अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत, तर अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी विद्यार्थी प्रचंड अभ्यास करून परीक्षेला सामोरे जात असतात.
त्यांच्या निकलावरून त्यांनी परीक्षेसाठी घेतलेली अपार मेहनत दिसून येते. पालकांच्या कष्टाचे चीज करण्याचे स्वप्न उराशी बाळगून बिकट परिस्थितीवर मात करत कचरावेचकांच्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बिस्मिल्ला मुला हिने दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवले आहेत, तर स्नेहा मस्के हिने ८१ टक्के गुण मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. तसेच मनुष्का बनसोडे हिने ८०.४ टक्के गुण मिळविले आहेत. चेतन नाईकवडे याने ७९.६० टक्के मिळवले आहेत.
बिस्मिल्ला मुल्ला हिचे शिक्षिका होण्याचे स्वप्न असून गरजू मुलांना विनामूल्य शिकविण्याचा तिचा मानस आहे. स्नेहा मस्के या विद्यार्थ्यींनीचे आई वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ आजी कांताबाई करतात. नातीने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याने आज्जीचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. मनुष्का बनसोडे हिला वेद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. चेतन नाईकवडे याचाही सांभाळ त्याची आजी शाकूबाई यांनी केला आहे. त्याच्या वडीलांचा करोळाकाळात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या आजीने त्याचा सांभाळ केला.





