Bhigwan News : ‘भिगवण बंद’ तून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त
Bhigwan News : भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेतली, तर आंदोलनस्थळी दिवसभर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भिगवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या निषेधार्थ ‘अमर बौद्ध संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्याला पाठिंबा म्हणून भिगवण, तक्रारवाडी आणि मदनवाडी येथील व्यापाऱ्यांनी सोमवारी (दि. ३) आपले सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले.
शासकीय कार्यक्रमांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणे बंधनकारक असतानाही महसूल विभागाने त्यांची प्रतिमा न ठेवून अवमान केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या हलगर्जीपणास जबाबदार असलेल्या आयोजकांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
निषेध नोंदवण्यासाठी अमर बौद्ध संघटने’च्या अमोल कांबळे, रोहित शेलार, अनिकेत भिसे, किरण कांबळे, संदीप वाघमारे, प्रेम लोंढे, रोहन निकाळजे आणि अभी लोंढे यांनी आमरण उपोषण सुरू केले. आंदोलनाला पाठिंबा म्हणून भिगवण मच्छी मार्केटसहभिगवण, तक्रारवाडी आणि मदनवाडी परिसरातील बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. सर्वपक्षीय, सर्व समाजाच्या पाठिंब्यामुळे हा बंद यशस्वी झाला. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेतली, तर आंदोलनस्थळी दिवसभर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उपोषण तात्पुरते स्थगित
दरम्यान, रात्री उशिरा आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने चौकशी व पुढील कार्यवाहीसाठी काही दिवसांचा वेळ मागितल्याने आंदोलकांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.





