पुणे : भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खूनाची घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांमुळे निर्माण झालेल्या वैवाहिक वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा निर्घृण खून केला. यानंतर तिचा मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी पतीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भिगवण-बारामती मार्गावर मदनवाडी गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाखाली काळ्या ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील नानासाहेब वणवे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी पथक दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता तर डोक्याची कवटी फुटलेली होती. हातावर रविराज असे गोंदण असल्याने तपासाला एक धागा मिळाला. भिगवण पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून फोटो व गोंदणाच्या आधारे परिसरातील पोलीस ठाण्यात माहिती प्रसारीत केली. दरम्यान, बारामती तालुका पोलिसांनी माहिती दिली की, कटफळ (ता. बारामती) येथील दिपाली सुदर्शन जाधव (३०) हि बेपत्ता असून तिच्या पतीने १४ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली आहे. हातावरील गोंदणावरून मृतदेहाची ओळख पटली. तपासादरम्यान पोलिसांनी पती सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव (३६, रा. कटफळ, ता. बारामती) याच्याकडे चौकशी केली असता तो सुरुवातीला समर्पक उत्तर देत नव्हता. मात्र सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, पत्नी दिपाली हिचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला होता. यावरून दोघांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी सकाळी वाद झाला. रागाच्या भरात त्याने लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यावर वार करून खून केला, आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून त्याच्या ज्युपिटर दुचाकीवरून मदनवाडी येथील ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी मधुकर भट्टे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांनी केली